आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काँग्रेसची पोकळी भरण्यासाठी सरसावले आमदार झांबड !

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- जिल्ह्यात काँग्रेसला सक्षम नेतृत्व नसल्याचे गेल्या काही महिन्यांपासून दिसून येते. ही पोकळी भरून काढण्यासाठी औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे आमदार सरसावले असल्याचे गेल्या काही दिवसांतील त्यांच्या कामावरून दिसून येते. त्यामुळे येत्या काळात सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार झांबड यांच्यात नेतृत्वावरून चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे.

झांबड यांनी बुधवारी पालिकेत जाऊन आयुक्तांची भेट घेतली. वेगवेगळी सात निवेदने त्यांनी आयुक्तांच्या समोर देत गुंठेवारी, समांतरसह वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा करतानाच काही माहितीही मागवली. आमदार झाल्यापासून झांबड आतापर्यंत पालिका मुख्यालयाकडे फिरकले नव्हते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी झांबड हे फुलंब्री तालुक्याच्या दौऱ्यावर होते. तेथे त्यांनी जिल्हा परिषदेच्या दोन सर्कलमध्ये जाऊन पाहणी केली तसेच कार्यकर्त्यांच्या भेटीही घेतल्या. काँग्रेस कार्यकर्त्यांना प्रारंभी हा निव्वळ योगायोग वाटला. मात्र, शुक्रवारी झांबड यांनी काँग्रेसची सत्ता असलेल्या जिल्हा परिषदेत जाऊन कामांचा आढावा घेतला. त्यापूर्वी त्यांनी वैजापूर, गंगापूर या तालुक्यांतील कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या. एकूणच झांबड यांनी आपला संपर्क वावर जिल्ह्यात सर्वदूर वाढवल्याचे समोर येत आहे.
लोकसभा, विधानसभेपाठोपाठ महानगरपालिकेतही दारुण पराभवामुळे काँग्रेस पक्ष दिशाहीन झाल्याचे चित्र आहे. यातून सावरण्यासाठी पालिका निवडणुकीनंतर काँग्रेसचे कार्यकर्ते कधीही एकत्र आले नाहीत. मोदी सरकारला एक वर्ष झाल्याच्या निमित्ताने निषेध नोंदवण्यासाठी काँग्रेसने रॅली काढली होती. त्यातील सहभागी कार्यकर्त्यांचा आकडा शंभरीच्या पुढे जाऊ शकला नाही. स्थानिक पदाधिकारी तसेच कार्यकारिणीत बदल होणार असल्याची चर्चा असल्याने कार्यकर्ते सक्रिय नसल्याचे दिसून येते. त्यातच मावळत्या आठवड्यात झांबड हे कोणताही गाजावाजा करता पक्षाच्या ड्रायव्हिंग सीटवर बसल्याचे दिसून आले. महानगरपालिका, जिल्हा परिषदेला भेट देण्याबरोबरच त्यांनी ग्रामीण भागातील वावर वाढवला आहे. सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार हे पक्षाचे नेतृत्व करतील, असे सर्वांनाच अपेक्षित होते, परंतु त्यांनी आपले लक्ष सिल्लोड विधानसभा मतदारसंघावरच केंद्रित केल्याचे स्पष्ट जाणवते. त्यामुळे झांबड यांना चांगली संधी असून याचा फायदा घेण्यास त्यांनी सुरुवात केल्याचे दिसते.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, काँग्रेसचे जिल्ह्यातील चित्र...
बातम्या आणखी आहेत...