आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेअरी फार्म योजनेतील भ्रष्टाचार : विधानसभेत आवाज उठवणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सततची नापिकी, अस्मानी संकट आणि कर्जबाजारीपणामुळे मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या करत आहे. त्यांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी इंटिग्रेटेड डेअरी फार्म पार्क योजना खूप महत्त्वाची ठरू शकली असती. मात्र, भ्रष्टाचारामुळे या चांगल्या योजनेचा बट्ट्याबोळ झाला. याेजनेतील गैरकारभाराची चौकशी करण्याऐवजी दुग्ध विकास खाते भ्रष्टाचारात मग्न असल्याची टीका खुलताबादचे आमदार प्रशांत बंब यांनी केली. याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मागणी करतानाच विधानसभेत तारांकित प्रश्न मांडणार असल्याचा निर्धारही त्यांनी केला. एवढेच नव्हे, तर त्यांनी लगेच बातमीचे कागदपत्र घेऊन घोटाळ्याचा पर्दाफाश करण्यास प्रारंभही केला आहे.

राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत काँग्रेस-राष्ट्रवादी शासनाच्या कार्यकाळात एकात्मिक दुग्धशाळा व प्रक्षेत्र उपवन प्रकल्प म्हणजेच इंटिग्रेटेड डेअरी फार्म पार्क ही योजना सुरू करण्यात आली होती. २००९ च्या या योजनेसाठी केंद्र शासनाचा निधी मिळाला होता. यासाठी २१६.७९ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. मराठवाडा, विदर्भ व कोकण या तिन्ही विभागांतील २३ जिल्ह्यांत हे प्रकल्प सुरू करण्याची योजना आखण्यात आली. एका जिल्ह्यात २ असे एकूण ४६ इंटिग्रेटेड पार्क उभारण्यात आले. एका पार्कच्या उभारणीसाठी ४७.१३ लाख रुपये निश्चित करण्यात आले. योजनेअंतर्गत मराठवाड्यात १६ पार्क मंजूर करण्यात आले.

खुलताबाद तालुक्यातील गोळेगावच्या रेणुका दूध उत्पादक संस्था मर्यादित आणि फुलंब्री तालुक्यातील पाथरीच्या यशवंत दुग्ध उत्पादक सहकारी संस्था मर्यादित यांची निवड झाली, पण दोन्ही ठिकाणी योजना साफ फेल ठरली आहे. योजनेतील भ्रष्टाचाराला "डीबी स्टार'ने १४ जानेवारीच्या अंकात "डेअरी फार्म योजना नासली' आणि १६ जानेवारीच्या अंकात "जिल्ह्यात दूध योजनेत ९४ लाखांची खैरात' या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करून वाचा फोडली. आमदार प्रशांत बंब यांनी या वृत्ताची गंभीर दखल घेऊन त्याची कागदपत्रे ताब्यात घेतली.

घोटाळा चव्हाट्यावर आणू
-याप्रकरणी एका उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्याची मागणी मी मुख्यमंत्री, सहकारमंत्री तसेच दुग्ध विकास मंत्र्यांकडे करणार आहे. येत्या अधिवेशनात तारांकित प्रश्न मांडून राज्यातील घोटाळा चव्हाट्यावर आणणार आहे.
-प्रशांत बंब, आमदार, खुलताबाद