आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरकरांचे जीवनमान उंचावणार: संग्राम जगताप

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- नगर शहराच्या विकासासाठी नागरिकांनी मोठ्या विश्वासाने मला निवडून दिले. शहर विकासाची महत्त्वाकांक्षा बाळगून नगरकरांचे जीवनमान उंचावण्यासाठी यापुढे मी काम करणार आहे, असे प्रतिपादन नवनिर्वाचित आमदार संग्राम जगताप यांनी शनिवारी केले.
महापालिका अधिकारी व कर्मचा-यांच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात जगताप बोलत होते. यावेळी आयुक्त विजय कुलकर्णी, उपायुक्त अजय चारठाणकर, महिला बालकल्याण समितीच्या सभापती नसीम शेख, शहर अभियंता नंदकुमार मगर, आरोग्याधिकारी डॉ. सतीश राजूरकर, मनपा कामगार संघटनेचे अध्यक्ष अनंत लोखंडे, नगरसेवक अजिंक्य बोरकर, विपुल शेटिया आदी उपस्थित होते. आयुक्त कुलकर्णी यांनी शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन जगताप यांचा सत्कार केला. सत्काराला उत्तर देताना जगताप म्हणाले, नगर शहर झपाट्याने वाढत आहे. सर्वांच्या सहकार्यातून शहराचा विकास साधावा लागणार आहे. आमदार म्हणून काम करताना महापौरपदाचा मागील अनुभव कामी येईल. शहर विकासासाठी औद्योगिकीकरण, व्यवसाय, उद्योगधंदे, तसेच शिक्षण क्षेत्राला चालना देण्यात येईल. शहर सुधारित पाणीपुरवठा योजना लवकरच मार्गी लागणार आहे. भुयारी गटार योजनादेखील मंजूर झाली आहे. शहरातील डीपी रस्त्यांचा प्रश्नही भविष्यात मार्गी लागणार आहे. मनपाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला कर्मचारी आकृतिबंधाच्या मंजुरीसाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे जगताप यांनी सांगितले.
आयुक्त कुलकर्णी म्हणाले, जगताप हे आपल्या कुटुंबातील सदस्य आहेत. ते आता आमदार झाले आहेत, ही आपल्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. नगर शहर विकसनशील असून अनेक कामे करण्यासारखी आहेत. त्यासाठी जगताप नक्कीच सहकार्य करतील, अशी अपेक्षा कुलकर्णी यांनी व्यक्त केली. सूत्रसंचालन अमोल बागुल यांनी केले. मुख्य लेखापरीक्षक श्रीकांत अनारसे यांनी आभार मानले.