आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यातील कार्यकर्त्यांना पवारांनी दिली दिशा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- मराठवाड्यातील ग्रामीण भागातून आलेल्या सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्त्यांना ताकद व दिशा देण्याचे कार्य सहकार महर्षी बाळासाहेब पवार यांनी केले. बाळासाहेब हे नेते घडविणारे उत्तुंग नेतृत्व होते, असे प्रतिपादन मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी केले.

विद्यापीठातील बाळासाहेब पवार अध्यासन केंद्रातर्फे शनिवारी (12 ऑक्टोबर) एकदिवसीय नेतृत्व शिबिर घेण्यात आले. शिबिराचे उद्घाटन चव्हाण यांच्या हस्ते झाले. विभागप्रमुख डॉ. एस. टी. सांगळे अध्यक्षस्थानी होते. या वेळी केंद्राचे संचालक प्रा. डॉ. विनायक भिसे यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी चव्हाण म्हणाले, मराठवाड्यातील नेतृत्वाची जडणघडण करणारी विद्यापीठ ही एक खाण आहे. विद्यार्थी संसद व युवक चळवळीतून विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे, वसंतराव काळे यांच्यासारखे उत्तुंग नेते घडले. बाळासाहेब पवार यांनी तर अतिशय सामान्य कुटुंबातील कार्यकर्ते आमदार-खासदार पदापर्यंत नेले. तीन सहकारी कारखाने उभारले आणि हजारो तरुणांना रोजगारही मिळवून दिला. मराठवाड्यातील तरुणांनी न्यूनगंड न बाळगता, तसेच इंग्रजीचा बाऊ न करता कौशल्य, बुद्धिमत्तेच्या बळावर यशस्वी व्हावे, असे आवाहनही चव्हाण यांनी या वेळी केले. विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड ऊर्जा असून संघर्ष व नेतृत्वाची परंपरा विद्यार्थ्यांनी पुढे न्यावी, असे आवाहन डॉ. सांगळे यांनी केले. शिबिरात पत्रकार कृष्णा केंडे, आचार्य जयप्रकाश बागडे, संजय शिंदे यांनीही मार्गदर्शन केले.

डॉ. विनायक भिसे यांनी प्रास्ताविकात, अध्यासन केंद्रातर्फे पवार यांच्यातील नेतृत्व, कर्तृत्व व व्यक्तिमत्त्वाचा परिचय विद्यार्थ्यांना करून देण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगितले. गणेश बडे या विद्यार्थ्याने सूत्रसंचालन, तर आत्माराम मुळीक याने आभार मानले. कार्यक्रमाला व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. प्रतिभा पाटील, डॉ. आर. एस. सोळंके, डॉ. धनर्शी महाजन, डॉ. संजय नवले, डॉ. सुनील नरवडे, डॉ. अशोक पवार, डॉ. पुरुषोत्तम देशमुख, डॉ. चंद्रकांत कोकाटे, डॉ. कृतिका खंदारे, डॉ. विलास इप्पर. डॉ. जालिंदर साबळे, नागराज कोले आदींची उपस्थिती होती.