आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंडेंच्या जाण्याने चव्हाण विजयी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मराठवाडा पदवीधर मतदारसंघात मोदींची लाट आणि आघाडीच्या विरोधातला रोष रोखण्यात राष्ट्रवादीचे उमेदवार सतीश चव्हाणांना यश मिळाले. पदवीधरमध्ये पहिल्यांदाच कोट्यातील मतांपेक्षा जास्तीची चार हजार मते घेऊन त्यांनी मोदींच्या लाटेवर स्वार झालेल्या युतीच्या नेत्यांना जमिनीवर आणले. गोपीनाथ मुंंडे यांची उणीव भाजपला भोवली. मुंडे असते तर नक्कीच 25 हजारांनी जिंकलो असतो, अशी प्रतिक्रिया भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांनी व्यक्त केली.

गेल्या वर्षभरापासून चव्हाण यांनी तयारी केली होती. मराठवाड्यात सर्वत्र त्यांचा वैयक्तिक संपर्क, शिक्षण संस्थांचे जाळे आणि स्वत:चे नेटवर्क जबरदस्त होते. मतमोजणी सुरू असतानाच त्यांनी आत्मविश्वासाने दुपारी चार वाजताच सोशल मीडियावर विजयाची घोषणा केली. बोराळकरांना प्रचारासाठी केवळ 25 दिवसांचा कालावधी मिळाला. त्यामध्ये मुंडे यांच्या निधनामुळे कार्यकर्ते हतबल झाले होते. विशेष म्हणजे या निवडणुकीत 12961 मध्ये अवैध ठरली.
मराठवाड्यात कोणत्याही निवडणुकीत एकहाती बाजी फिरवण्यात मुंडेंचा हातखंडा होता. बोराळकरांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी त्यांनी विजयाचे संकेत दिले होते. मात्र बोराळकर अर्ज भरण्याच्या दिवशीच मुंडेंचे निधन झाले आणि बोराळकरांचा पराभव डोळ्यासमोर दिसू लागला. त्यानंतर पुढचे दहा दिवस भाजप प्रचारातून गायब झाला. कार्यकर्ते मुंडेंच्या निधनाने शोकाकुल झाल्यामुळे प्रचाराची यंत्रणाच कोलमडली. बीडमध्ये तर मुंडेंचा चौदावा झाल्यानंतर काही प्रमाणात कार्यकर्ते कामाला लागले. स्वत: उमेदवार बीडमध्ये प्रचार करू शकले नाहीत. त्यामुळे ज्या प्रमाणात बीड जिल्ह्यात मतदारांना मतदानासाठी बाहेर आणणे गरजेचे होते ते शक्य झाले नाही.

उशिरा उमेदवारीचा फटका
चव्हाणांनी पदवीधरची तयारी गेल्या वर्षभरापासून केली होती. त्यामुळे निवडणुकीची घोषणा होण्याअगोदर त्यांचे प्रचाराचे दोन टप्पे पूर्ण झाले होते. तसेच शिक्षण संस्था ताब्यात असल्याचा त्यांना फायदा झाला. त्यांच्या प्रचारासाठी हजारो कार्यकर्ते काम करत होते. तर भाजपचा उमेदवार 25 मे रोजी घोषित झाला. त्यातच बोराळकर यांचे नावही मराठवाड्यात सर्वत्र परिचित नसल्यामुळे मोदींची लाटदेखील कॅश करता आली नाही. उशिरा उमेदवारी दिल्यामुळे मतनोंदणीतही ते पिछाडीवर राहिले.
(छायाचित्र - विजयाची माळ गळ्यात पडताच सतीश चव्हाण यांना कार्यकर्त्यांनी खांद्यावर घेऊन जल्लोष केला. छाया : माजेद खान)