आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MLA Satish Chavhan Comment On University Kulguru

दबावांना बळी पडणारे हे पहिलेच कुलगुरू, आमदार सतीश चव्हाण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - विद्यापीठाच्या इतिहासात आपल्या विविध कामांमुळे चर्चेत असणारे कुलगुरू आजपर्यंत अनेक पाहिले; परंतु दबाव गटांना बळी पडत, मिनिटा-मिनिटाला आपला निर्णय बदलणारे डॉ. बी. ए. चोपडे हे पहिलेच कुलगुरू आहेत, असे परखड टीका आमदार सतीश चव्हाण यांनी केली.
मशिप्र मंडळाच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची घोषणा करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत चव्हाण यांनी कुलगुरूंच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून डॉ. विजय पांढरीपांडे यांचा कार्यकाळ संपल्यानंतर डॉ. बी. ए. चोपडे यांची कुलगुरू म्हणून निवड करण्यात आली. त्यांचा अकॅडमिक बायोडाटा आणि संशोधनातील ऐकलेला गवगवा पाहून खूप चांगले कुलगुरू विद्यापीठाला मिळाल्याची चर्चा बराच काळ रंगली. परंतु सध्याची विद्यापीठाची जी परिस्थिती आहे ती पाहता विद्यापीठ कुठे नेऊन ठेवले आहे ? असा प्रश्न पडला असल्याचे आमदार चव्हाण म्हणाले. ज्या पद्धतीने कुलगुरू विद्यापीठ आणि इतर कार्यक्रमात भाषणे करत आहेत आणि त्या माध्यमातून ज्या पद्धतीने सर्वत्र स्वत:ला प्रमोट करत आहेत त्यामुळे विद्यापीठाची प्रतिमा वाईट होत असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

आजपर्यंत विद्यापीठात अनेक कुलगुरू येऊन गेले आहेत. त्यात काहींच्या कडक शिस्तीचा तर काहींच्या कार्याचा दबदबा होता. विद्यापीठाच्या बाबतीत विचार केल्यास कुलगुरू हे जबाबदार पद आहे. त्यामुळे कोणताही निर्णय विचारपूर्वक आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थी हित लक्षात घेऊनच घ्यायला हवा. मात्र, "कुणीही यावे अन् टपली मारून जावे'

अशी परिस्थिती निर्माण करत कुलगुरू अविचाराने दबाव गटांना बळी पडत संघटनांचे ऐकून कोणतेही निर्णय घेत असल्याचा आरोपही चव्हाण यांनी केला. जे विद्यापीठाच्या इतिहासात कोणही केले नाही ते डॉ.चोपडे करत आहेत. या सर्व गोंधळाचे पडसाद वाईट पद्धतीने उमटत आहेत, असेही सतीश चव्हाण म्हणाले.
कारभारावर प्रश्नचिन्ह

आमदार सतीश चव्हाण यांनी कुलगुरू डॉ. चोपडे यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण केले. याबाबत कुलगुरू डॉ. चोपडे यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता रात्री उशिरापर्यंत त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.