आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MLA Sattar Difficult Work, Balance Outside Party

जिल्हाध्यक्षपदामुळे आमदार सत्तारांची कसरत, पक्षाबाहेरील संबंधांना मुरड घालावी लागणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिल्लोड - जिल्ह्याचे नेतृत्व हाती आल्याने आमदार अब्दुल सत्तार यांना अधिक जबाबदारीने वागावे लागणार असून निवडणुकीच्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन पक्षीय विचार व कार्यकर्त्यांना आपलेसे करून वाटचाल करावी लागणार आहे. राजकीय पक्षाची गाडी लोकप्रतिनिधी व संघटनेचे पदाधिकारी या दोन चाकांवर चालत असल्याने दोन्ही बाजूंना सारखेच महत्त्व आहे. परंतु या दोनही बाजू एकमेकांवर कायम कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतात. परंतु लोकप्रतिनिधींवरच पक्षाची धुरा सोपवली जाते त्या वेळी त्यांच्यासाठी हा कसोटी काळ असतो. अशाच कसोटीला पुढील काळात आ. सत्तार यांना सामोरे जावे लागणार आहे. पक्षाचा विचार प्रखरपणे कार्यकर्त्यांसमोर ठेवून संघटना चालवण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असल्याने निवडणुकीच्या राजकारणासाठी अन्य पक्षीयांसोबत कराव्या लागणाऱ्या तडजोडींना यापुढे आवर घातला तरच संघटना मजबूत होणार आहे. आ. सत्तार यांचा आजपर्यंतचा राजकीय इतिहास पाहता मंत्रिपदापर्यंत पोहोचण्यासाठी मोठ्या प्रमाणात तडजोडी कराव्या लागल्या आहेत.

सिल्लोड शहराचे पहिले नगराध्यक्ष होण्यापासून ते कॅबिनेट मंत्री होईपर्यंत संघर्ष करणाऱ्या सत्तार यांना निवडणुकीच्या राजकारणाचा मोठा अनुभव आहे. कै. माणिकराव पालोदकरांचे बोट धरून राजकारण करताना राजकीय कारकीर्दीसाठी अडथळे निर्माण करण्यात येत असल्याचे लक्षात येताच त्यांनी पालोदकरांनाच राजकारणातून हद्दपार केले. यासाठी तब्बल दहा वर्षे भाजपला साथ दिली. त्यांना डावलून काँग्रेसने सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून रंगनाथ काळे यांना उमेदवारी दिल्याने चिडलेल्या सत्तारांनी बंडखोरी केली होती. त्यांच्या समाजाने त्यांना परिपूर्ण साथ दिल्याने ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले. भाजपचे उमेदवार किसनराव काळे दुसऱ्यांदा विजयी झाले होते. त्यानंतर या मतदारसंघासाठी काँग्रेसने व कार्यकर्त्यांनी त्यांच्याशिवाय दुसऱ्या कुणाचाही विचार आजपर्यंत केला नाही.

एकेकाळी भाजपला साथ देणाऱ्या सत्तारांनी २००९ मध्ये हा मतदारसंघ भाजपकडून हिसकावून घेतला. भाजपवर कुरघोडी करण्यासाठी त्यांनी एकेकाळचे त्यांचे हाडवैरी प्रभाकर पालोदकरांशी जमवून घेतले. दोन विधानसभा निवडणुकांपासून पालोदकर -सत्तार जोडी सर्व निवडणुकांमध्ये सोबत असते. २००९ पर्यंत भाजपच्या सोबत असलेल्या पालोदकरांना योग्य सन्मान भाजपला देता आला नाही. त्यामुळे दुखावलेल्या पालोदकरांना हेरून संधीचे सोने केले. मागच्या वर्षी झालेल्या औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँक व दूध संघाच्या निवडणुकीत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याशी जमवून घेतले. त्यांच्या युतीमुळे दोन्ही निवडणुकांत भाजपच्या कार्यकर्त्यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले. दुसऱ्या बाजूला फुलंब्रीत काँगेसचे माजी आमदार कल्याण काळे यांना फटका बसला. मागच्या पंधरा वर्षांपासून निवडणुकीच्या राजकारणात यशस्वी ठरणाऱ्या सत्तारांना पक्षाबाहेरील संबंधांना मुरड घालून कार्यकर्त्यांच्या भल्याचा विचार लागणार आहे. यात ते यशस्वी झाल्यास त्याचा दबदबा वाढणार आहे.

आमदार सत्तारांना राज्य नेतृत्वाची संधी ?
वैयक्तिक पातळीवर निवडणूक जिंकण्याचा मोठा अनुभव असलेल्या सत्तारांना जिल्हाध्यक्षपद मिळाल्याने जिल्ह्यावर त्यांची पकड निर्माण होऊ शकते. त्यांच्या राजकीय जीवनात त्यांना त्यांच्या समाजानेही कायम साथ दिली आहे. याच आधारावर त्यांच्याकडे काँग्रेसचे राज्याचे नेतृत्व येऊ शकते.