आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मी निवडणूक लढली नसती तर तनवाणी आमदार झाले नसते -सुभाष झांबड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- मागील निवडणूक लढली नसती तर अब्दुल सत्तार यांचा पराभव झाला नसता आणि शिवसेनेचे किशनचंद तनवाणी कदापि आमदार झाले नसते. ती माझी चूक होती, अशा शब्दांत औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य मतदारसंघातील काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुभाष झांबड यांनी दिलगिरी व्यक्त केली.

शनिवारी सायंकाळी पाच वाजता औरंगाबाद जिमखाना क्लबमध्ये तीन मंत्र्यांच्या उपस्थितीत बैठकीदरम्यान त्यांनी हे वक्तव्य केले. या बैठकीस प्रसारमाध्यमांना मज्जाव करण्यात आला होता.

बैठकीत उपस्थित असलेल्या काही कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ‘मला या वेळी निवडणूक रिंगणात यायचे नव्हते, पण पक्षाने जबाबदारी दिल्याने मी ती स्वीकारली’, असे झांबड यांनी सांगितले. त्यामुळे मतदारांचा भ्रमनिरास झाला. लढायचे नव्हते तर उभे राहिलात कशाला, असा सवाल उपस्थित मतदारांनी केल्याचे समजते. काँग्रेस आघाडीचे 99 टक्के मतदार या बैठकीला उपस्थित होते, असा दावा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष केशवराव औताडे यांनी केला.

आचारसंहिता सुरू असल्याने कोणताही गाजावाजा न करता ही बैठक बोलावण्यात आली होती. पालकमंत्री बाळासाहेब थोरात, शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, राजेश टोपे हे मंत्री बैठकीला येणार असल्याचेही मतदारांना सांगण्यात आले नव्हते. नियोजनाची बैठक असल्यामुळे सर्वच मतदार उपस्थित होते. सर्वच मंत्र्यांनी मतभेद विसरून झांबड यांना निवडून देण्याचे आवाहन या वेळी केले.

बैठकीला पालकमंत्री बाळासाहेब थोरात, शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे, आमदार डॉ. कल्याण काळे, सतीश चव्हाण, एम. एम. शेख, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुरेश पाटील, माजी खासदार उत्तमसिंह पवार, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष केशवराव औताडे, शहराध्यक्ष अँड. सय्यद अक्रम, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर सोनवणे, शहर कार्याध्यक्ष विनोद पाटील उपस्थित होते.