आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद: तुम्हीच तुमच्या मालमत्तांचे सर्वेक्षण करा अन् कर भरा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद: जास्तीत जास्त मालमत्ताधारकांनी आपापल्या मालमत्तेचा कर भरावा यासाठी पालिकेकडे वेळोवेळी प्रयत्न केले जातात. परंतु मालमत्तांचे सर्वेक्षण करून त्याला कर आकारणीसाठी पालिकेचे मनुष्यबळ कमी पडते. मालमत्तेचे सर्वेक्षणच नाही, करच लावण्यात आला नाही, तेव्हा आम्ही कर भरणार कसे, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जातो. तर आम्हाला कराची नोटीसच आली नाही तेव्हा काय करायचे, असाही प्रश्न मालमत्ताधारक करतात. या सर्व प्रश्नांना उत्तरे देण्यापेक्षा तुम्हीच तुमच्या मालमत्तांचे सर्वेक्षण करा अन् कर भरा, अशी ‘स्वयं मूल्य निर्धारण’ योजना नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. 
 
मालमत्ता कराची वसुली वाढवण्यासाठी ही योजना आयुक्त दीपक मुगळीकर यांनी जाहीर केली. आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली कर मूल्य निर्धारण अधिकारी वसंत निकम यांनी नागरिकांसाठी घोषणापत्राचा नमुना तयार केला. तो जाहीरही करण्यात आला आहे. परंतु गेल्या सात दिवसांत त्याला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. मालमत्तांचे प्रकार, त्याचा दर, नेमकी कशाची मोजणी करायची हे नमुना पत्रात स्पष्ट करण्यात आले तरी ते नागरिकांना सहज उमगत नाही. ते सुलभतेने समजावे यासाठी तज्ज्ञांशी चर्चा करून स्वयंमूल्य निर्धारण कसे करायचे हे ‘दिव्य मराठी’ने जाणून घेतले. 
 
वाॅर्ड कार्यालयात अर्ज उपलब्ध 
- पालिकेच्या वतीने स्वयं कर निर्धारणासाठी वृत्तपत्रांत अर्जाचा नमुना तसेच कसे मूल्यांकन करावे, याची माहिती दिली आहे. वृत्तपत्रातील अर्जाच्या नमुन्याचाही वापर तुम्ही करू शकता. त्याचबरोबर प्रत्येक वाॅर्ड कार्यालयात असे अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे. तेथून अर्ज घेऊन ते भरता येतील. 
 
मूल्यांकन कमी अधिक झाल्यास काय? 
नागरिकांनी हे स्वत: केलेले मूल्यांकन आहे. ते अंतिम धरले जाणार नाही. यानंतर सोयीनुसार पालिकेतर्फे तज्ज्ञांच्या वतीने मूल्यांकन केले जाईल. त्यानंतर कर ठरवला जाईल. जर स्वयंमूल्यांकनात कर जास्त आकारण्यात आल्याचे स्पष्ट झाले तर तो नंतर कमी केला जाईल आणि कमी असेल तर नंतर वसूल केला जाईल. 
 
नागरिकांनी सहकार्य करावे 
- स्वयंमूल्य निर्धारण कसे करावे हे नागरिकांना समजावे यासाठी आम्ही ते सहज सोप्या भाषेत देण्याचा प्रयत्न केला आहे. आयुक्तांच्या तशा सूचना होत्या. तरीही नागरिकांना काही अडचणी आल्यास वाॅर्ड अधिकारी किंवा कर मूल्य निर्धारण कार्यालयात ते विचारणा करू शकतात. नागरिकांकडून सहकार्य मिळावे. -वसंत निकम, उपअभियंता तथा कर मूल्य निर्धारण अधिकारी. 
 
याची मोजणी वगळावी : शौचालय (टॉयलेट अन् बाथरूमही), जिना आणि कॉमन पॅसेज याला कर लागत नाही. त्यामुळे मालमत्तेच्या करासाठी स्वयंमूल्यांकन करताना याची मोजणी करू नये. 
 
अशी करा निवासी मालमत्तांची मोजणी 
निवासी मालमत्तेमध्ये समजा तुमच्या १० बाय ४० फूट आकाराच्या चार खोल्या आहेत. म्हणजेच हे बांधकाम १६०० चौरस फूट होते. कर आकारताना चौरस मीटरनुसारचे एकक वापरले जाते. १६०० चौरस फुटांची मीटरमध्ये मोजणी केल्यास ते १४८.६४ चौरस मीटर इतके होते. निवासी वापराचे मासिक अपेक्षित भाडे ठरवण्यासाठी प्रतिचौरस मीटर ११ रुपये असा दर आहे. १४८.६४ मीटर गुणिले ११ म्हणजेच १६३२ रुपये होतात. हे भाडे दरमाहचे आहे. म्हणजेच वर्षाचे (१६३२ गुणिले १२) १९ हजार ५८४ रुपये होतात. त्यातून देखभाल दुरुस्तीचे १० टक्के म्हणजेच १९६२ रुपये वजा केले की भाड्या योग्य वार्षिक मूल्य हे १७ हजार ६२२ रुपये होते. या रकमेच्या ५८.७ टक्के म्हणजेच १० हजार ३२९ ही रक्कम झाली तुमचा वार्षिक मालमत्ता कर. यात १०० रुपये उपभोक्ता कर म्हणून मिळवण्यात यावा. म्हणजे १० हजार ४२९ हा तुमचा अंतिम मालमत्ता कर. व्यावसायिक मोजणी करताना हाच निकष आहे. फक्त दरात फरक आहे. व्यावसायिक वापरासाठी आकारणीचा दर प्रतिचौरस फूट २८ रुपये असा आहे आणि एकूण योग्य मूल्याच्या ९४.५ टक्के कर हा मालमत्ता कर ठरतो. व्यावसायिक मालमत्तांसाठी उपभोक्ता कर ५०० रुपये इतका आहे.