आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'मनरेगा मजुरांना राहुल गांधींनी मजुरी द्यावी\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद-सन 2010 ते 2013 दरम्यान सिल्लोड तालुक्यात मनरेगा योजनेअंतर्गत काम केलेल्या 1100 मजुरांना आजतागायत वेतन मिळालेले नाही. नैराश्येपोटी यापैकी 6 मजुरांनी आत्महत्या केली असून बुधवारी औरंगाबाद दौर्‍यावर येत असलेले कॉँग्रेसचे युवा नेते राहुल गांधी यात लक्ष घालतील काय, असा सवाल आयटक नेते डॉ. भालचंद्र कांगो यांनी केला आहे.
सिल्लोड तालुक्यातील मनरेगा कामांसाठी बुलढाणा, जालना आणि जिंतूरमधील मजुरांना नेमण्यात आले होते. तथापि, त्यांना मजुरीच देण्यात आली नाही. या प्रश्नावर आयटकने आवाज उठवला होता. आंदोलनांनंतर केंद्र सरकारने सामाजिक लेखापरीक्षण (सोशल ऑडिट) करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीने 8 ते 12 फेब्रुवारी दरम्यान लेखापरीक्षण करून अहवाल केंद्राला सादर केला आहे. त्यात राज्य सरकारने सर्व संबंधित मजुरांना कायद्याप्रमाणे तत्काळ मजुरी द्यावी, अशी सूचना करण्यात आली आहे. मनरेगा योजनेसाठी कंत्राटदारांची मध्यस्थी तत्काळ थांबवावी, मनरेगा घोटाळ्याची चौकशी सरकारने स्वतंत्र समिती नेमून करावी, मजुरी न देण्याची प्रथा ताबडतोब बंद करावी, घोटाळ्याची पोलिस चौकशी मुदतीत पूर्ण करावी, या चौकशीसाठी सरकारने पोलिसांना मनरेगाच्या तज्ज्ञांची मदत द्यावी, या घोटाळ्यात गुंतलेल्या अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करावी, अशा शिफारशीही या समितीने केल्या आहेत. राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला समितीच्या शिफारशी लागू करण्याचे निर्देश द्यावेत, अशी अपेक्षा डॉ. कांगो यांनी व्यक्त केली. लेखापरीक्षण समितीत डॉ. नितीन धाकतोडे, उज्ज्वल पहुरकर, आनंदिता अधिकारी, इनायत अनैता साबिखी, गोपाळ महाजन, अजय होले या सामजिक तज्ज्ञांचा समावेश होता.