आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवी रचना: औरंगाबाद शहरातील मनसेच्या 99 शाखा बरखास्त

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- जुन्या अध्यक्षांनी गठीत केलेली मनसेची कार्यकारिणी नवीन शहराध्यक्ष सुमीत खांबेकर यांनी बरखास्त केली आहे. माजी पदाधिकार्‍यांनी गठीत शहरातील 99 वॉर्डातील शाखा बरखास्त करण्यात आल्या. काही शाखांचे काम उत्तम पद्धतीने सुरू असूनही त्या बरखास्त करण्यात आल्या. या निर्णयामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. नवीन कार्यकारिणीत विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांचा सहभाग मोठय़ा प्रमाणावर होणार असल्याची चर्चा आहे.

आगामी विधानसभा निवडणुकासाठी मनसेच्या नवीन कार्यकारिणीने मंगळवारी (9जुलै)कामास प्रारंभ केला आहे. सुभेदारी विर्शामगृहात झालेल्या बैठकीत टीव्ही सेंटर, सर्मथनगर, औरंगपुरा, सिल्लेखाना, गुलमंडी, बेगमपुरा, राजा बाजार या मध्य मतदारसंघातील सुमारे 25 शाखा बरखास्त झाल्याचे जाहीर करण्यात आले. पश्चिम मतदारसंघाच्या बैठकीत उर्वरित शाखा बरखास्त केल्या जाणार आहेत. 30 जुलैपर्यंत सर्व शाखांची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. महिला आणि विद्यार्थी सेनेची वॉर्डनिहाय नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात येईल. सामान्य कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतरच उमेदवार निवडला जाणार आहे. त्यासाठी वॉर्डातील घरामध्ये पत्रके टाकून आपला वॉर्ड अध्यक्ष कोण हवा, हे विचारले जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवाराची मुलाखत घेण्यात येईल. ‘वॉर्ड तिथे शाखा’आणि ‘घर तिथे मनसेसैनिक’ असा उपक्रम मनसेने हाती घेतला आहे. शाखेच्या नवीन कार्यकारिणीत मुस्लिम आणि दलित कार्यकर्त्यांना प्रामुख्याने संधी देण्यात येणार असल्याचे मध्य मतदारसंघाचे अध्यक्ष राज वानखेडे यांनी सांगितले. या वेळी शहराध्यक्ष सुमीत खांबेकर, रवी जाधव, समीर कुरेशी, मंगला राऊत, डॉ. सुनीता सांळुके, संजोब बडवे यांची प्रमुख उपस्थिती होती.

नवीन कार्यकारिणीत मनविसेला झुकते माप
नव्याने जाहीर केलेल्या कार्यकारिणीत मनविसेच्या पदाधिकाधिर्‍यांना महत्त्वाची पदे मिळाली आहे. नवीन शाखा निवडीच्या प्रक्रियेत मनविसेच्या कार्यकर्त्यांना झुकते माप दिले जाईल अशी आशा आहे. राजकारणात नवीन असणार्‍या तरुणांना निवडणूक लढवण्याचे तंत्र काय समजणार. शाखा बरखास्तीचा निर्णय पक्षाला विस्कळीत करणारा ठरेल.

जुन्यांच्या बहिष्कारात नव्याचे काम सुरू
जुन्यांच्या बहिष्कारात आज नवीन कार्यकारिणीचे काम सुरू झाले आहे. मंगळवारी मध्य मतदारसंघातील आजी-माजी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन काम सुरू केले. शहराध्यक्ष हा महत्त्वाचा दुवा असून पक्ष वाढीसाठी त्याचे काम महत्त्वपूर्ण राहील, अशी माहिती मध्य मतदारसंघाचे अध्यक्ष राज वानखेडे यांनी दिली.