आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद - विकासकामांना, चाळणी झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी पैसे नसलेल्या मनपाने जायंट्सच्या अधिवेशनाला 15 लाख आणि विविध नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त क्रीडा स्पर्धांना दिलेला निधी म्हणजे सर्वसामान्यांच्या पैशाची उधळपट्टी असल्याचा आरोप करत मनसेने मंगळवारी मनपासमोर चक्क क्रिकेट खेळत मनपाचा धिक्कार केला. मनपा आणि महापौर-उपमहापौरांसह मनपा प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करीत मनसेने परिसर दणाणून सोडला.
औरंगाबाद शहराची दयनीय अवस्था झाली आहे. तिजोरीत खडखडाट असलेल्या मनपाकडे खराब रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी पैसे नाहीत, विकासकामांना पैसे नाहीत, असे असताना दुसरीकडे अनावश्यक बाबींवर उधळपट्टी सुरू आहे. 19 नोव्हेंबरच्या सर्वसाधारण सभेत जायंट्सच्या अधिवेशनासाठी 15 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला, तर हॉकी संघटनेच्या महिला व पुरुष हॉकी स्पर्धांसाठी प्रत्येकी 5 लाख रुपये देण्यास मंजुरी दिली. शिवाय 12 डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित क्रिकेट स्पर्धेसाठी 5 लाख रुपये देण्याची तयारी दर्शवली होती, तर 19 डिसेंबर रोजी रद्द झालेल्या सर्वसाधारण सभेत गरुडझेप बहुउद्देशीय युवा मंचच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी 2 दोन लाख रुपये देण्याचा प्रस्ताव होता.
वॉर्डातील फुटकळ कामांसाठी लाखभर रुपये देण्याचीसुद्धा स्थिती नसताना मनपा अशा अनावश्यक बाबींवर किमान 35 लाख रुपयांची उधळपट्टी करायला निघाली आहे. त्याचा निषेध करण्यासाठी मनसेने मंगळवारी मनपासमोर अभिनव आंदोलन केले. मनपाच्या प्रवेशद्वारासमोर क्रिकेटचे पिच आखत प्लास्टिकच्या बॅट-बॉलने क्रिकेट खेळत त्यांनी मनपाचा निषेध नोंदवला. चेंडू मनपाच्या आवारात भिरकावले.
या आंदोलनात मनसेचे शहराध्यक्ष सुमीत खांबेकर, ज्ञानेश्वर डांगे, संतोष पाटील, नगरसेवकर राजगौरव वानखेडे, आशिष सुरडकर, अरविंद धीवर, सतनामसिंग गुलाटी, लीला राजपूत, मंगला राऊत, रवी गायकवाड, अजय गटाणे, संजय चव्हाण, सपना ढगे, डॉ. सुनीता सोळुंके यांच्यासह मनसेचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.