आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mns District Presidant Dilip Bankar And Zp Clark Clashesh In Aurangabad

मनसेचे जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर, लिपिकात चप्पल-बुटाने हाणामारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर आणि जिल्हा परिषद शिक्षण विभागातील निलंबित लिपिक यांच्यात शुक्रवारी चप्पल-बुटाने मारहाण झाली. हा तमाशा पाहण्यासाठी कार्यालयाच्या आवारात तोबा गर्दी जमली होती.

शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली प्रकरणात निलंबित लिपिक शिवाजी खंडागळे आणि बनकर यांच्यात सामान्य प्रशासन विभागासमोर सकाळी अकरा वाजता शाब्दिक चकमक उडाली. बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले. शिक्षकांच्या बदली प्रकरणावरून या दोघांमध्ये तीन महिन्यांपासून शीतयुद्ध सुरू आहे. काही दिवसांपूर्वी या दोघांमधील वादावर पदाधिकार्‍यांनी मध्यस्थी करून पडदा पाडला होता. शुक्रवारी बनकर कार्यकर्त्यांसह गप्पा मारत उभे होते. दरम्यान, खंडागळे आणि एकमेकांची नजरानजर झाली. बनकर यांनी खंडागळे यांना बुटाने मारहाण केली. प्रत्युत्तरादाखल खंडागळे यांनी त्यांच्यावर चप्पल भिरकावली. दोघांमध्ये अगदी फिल्मीस्टाइल हाणामारी झाली. हा प्रकार पाहण्यासाठी कर्मचार्‍यांनी तोबा गर्दी केली. दरम्यान, जिल्हा परिषद सदस्य दीपक राजपूत, रामदास पालोदकर, अनिल चोरडिया यांनी मध्यस्थी केली.

दहा मिनिटांत शुकशुकाट
जि. प. आवारात हाणामारी झाल्यानंतर अवघ्या दहा मिनिटांतच संपूर्ण परिसरात शुकशुकाट झाला. प्रकरण वाढेल या भीतीने कर्मचार्‍यांनी तेथून काढता पाय घेतला. मनसेच्या जिल्हाध्यक्षांना मारहाण होत असताना त्यांचे कार्यकर्तेही या वादात पडले नाहीत. रात्री उशिरापर्यंत पोलिसांत तक्रार देण्यात आली नव्हती.

दोन महिन्यांपूर्वीचे वैर
दोन महिन्यांपूर्वी बदली प्रकरणावरून बनकर यांनी खंडागळे यांना शिक्षण सभापती बबन कुंडारे आणि बांधकाम सभापती डॉ. सुनील शिंदे यांच्या दालनात बोलावून झापले होते. या वेळी त्यांच्यात वादावादी झाली होती.

लिपिक मनोरुग्ण
निलंबित लिपिक मुळात मनोरुग्ण आहे. कारण नसताना त्याने मला शिवीगाळ केली. त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, पुन्हा उंच आवाजात शिवी दिल्याने मला राग आला आणि मी माझा हात दाखवला. हा निलंबित असल्यामुळे त्याची मानसिकता ढासळली आहे. - दिलीप बनकर, जिल्हाध्यक्ष, मनसे.

सतत त्रास देत असे
बनकर यांच्याकडून सतत त्रास होता. मी सांगेन त्या शिक्षकांचे नाव बदलीच्या यादीत नोंदवा, असा त्यांचा लकडा होता. त्यांचे ऐकले नाही म्हणून मनात राग धरून त्यांनी मला मारहाण केली. - शिवाजी खंडागळे, निलंबित लिपिक.