आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भास्कर गाडेकरांचे इंजिन मनसेच्या फलाटाबाहेर; पद गेल्याने रडू कोसळले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- गेल्या पाच वर्षांपासून औरंगाबाद जिल्हा मनसेचे जिल्हाध्यक्ष असलेल्या भास्कर गाडेकर यांची उचलबांगडी करण्यात आली. चारा छावणीच्या निधीत घोळ केल्याचा नेत्यांना संशय आल्याने त्यांना कार्यकारिणीत कोणत्याही पदावर स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे फुलंब्री विधानसभा निवडणूक लढण्याच्या तयारीत असलेल्या गाडेकरांना रडू कोसळले. पक्षासाठी लाठय़ा-काठय़ा खाल्ल्याचे हेच फळ काय, असा सवाल करत त्यांनी मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांना भेटून त्यांच्याकडे गार्‍हाणे मांडणार असल्याचे सांगितले. संपर्कनेते बाळा नांदगावकर यांच्यावरही अप्रत्यक्ष शरसंधान केले. मात्र, कोणत्याही परिस्थितीत पक्ष सोडणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मूळ शिवसैनिक असलेले गाडेकर यांनी 2007 मध्ये जिल्हा परिषद सदस्य असताना शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. राज्यातील सर्वात तरुण जिल्हा परिषद सदस्य अशीही त्यांची ओळख होती. तरीही त्यांनी पदाचा राजीनामा देऊन मनसे बांधणीचे काम सुरू केले. सात वर्षांत अनेक आंदोलनाचे नेतृत्व केले. त्यामुळे त्यांच्या महत्त्वाकांक्षेला धुमारे फुटू लागले होते. विधानसभा निवडणुकीच्या मोर्चेबांधणीचा एक भाग म्हणून त्यांनी फुलंब्रीत चारा छावणीही सुरू केली. मात्र, त्याकरिता पक्षाकडून मिळालेल्या 45 लाख रुपयांचा गैरवापर झाला, अशी चर्चा मुंबईपर्यंत पोहोचली आणि त्यांना फटका बसला. जिल्हा, शहर कार्यकारिणीचे पत्ते नव्याने पिसण्यासाठी आलेले मनसेचे विधिमंडळातील गटनेते, आमदार बाळा नांदगावकर यांनी गाडेकरांना खड्यासारखे उचलूून बाजूला फेकले. जिल्हाध्यक्षपदावरून त्यांची रवानगी थेट कार्यकर्तापदावर करण्यात आली.

एका दिवसात रात्र झाली
बुधवारी सकाळी 11 वाजता नांदगावकरांनी जालन्यातून कार्यकारिणीची घोषणा केली. त्यात गाडेकरांना कोणतेच स्थान नसल्याचे कळताच त्यांच्या सिडकोतील कार्यालयात दुपारी कार्यकर्त्यांनी गर्दी केली आणि त्यांच्यासमोरच गाडेकरांनी अर्शूंना वाट करून दिली. ‘भास्कर तर अतुल सरपोतदारांच्या जवळचा मानला जातो. त्याचे पद कसे जाऊ शकते,’ असा प्रश्न ते विचारत होते.

हुर्ज‍यांना पदे दिली
मुंबईहून आलेल्या नेत्यांच्या पुढे पुढे करणार्‍यांनाच पदे देण्यात आली. माझा कामावर विश्वास असल्याने मी नेत्यांची हुजरेगिरी कधीच केली नाही, अशा शब्दांत गाडेकर यांनी नांदगावकर यांचे नाव न घेता टीका केली. मी महाविद्यालयीन काळापासून राज सर्मथक आहे आणि आयुष्यभर राहणार.दोन दिवसांत वेळ घेऊन मी मुंबईला राजसाहेबांच्या भेटीला जाणार आहे. त्यांचा निर्णय अंतिम राहील, असेही ते म्हणाले.

राज ठाकरेंकडे गार्‍हाणे मांडणार

पुरणपोळी अंगलट
फुलंब्री येथे गाडेकर यांनी सुरू केलेल्या चारा छावणीला पाच मे रोजी राज यांनी भेट दिली. त्या वेळी त्यांच्या हातून जनावरांना पुरणपोळीचा घास भरवण्याचे त्यांनी ठरवले होते. मात्र, राज यांनी घास भरवण्यास नकार दिला. पुरणपोळी अंगलट येणार, अशी चर्चा कार्यकर्त्यांत होती.

कारवाई होऊ शकते
>पदाधिकार्‍यांची निवड मी एकट्याने केलेली नाही. तरीही पद गेल्यानंतर गाडेकरांसाठी बाळा नांदगावकर वाईट झाला. आतापर्यंत पदासाठी काम केले, आता पदाविना काम करावे. अन्यथा यापेक्षाही कडक कारवाई होऊ शकते.
- बाळा नांदगावकर, मनसे विधिमंडळ गटनेते