आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवा ‘डाव’: शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात मनसेच्या नेत्यांनी पिसले नव्याने पत्ते

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- औरंगाबादेतील पदाधिकार्‍यांच्या कामावरील नाराजीमुळे बर्‍याच काळापासून प्रलंबित असलेल्या मनसेच्या कार्यकारिणीतील फेरबदलांना अखेर मुहूर्त लागला. बाळा नांदगावकर आणि त्यांच्या शिलेदारांनी नव्याने पत्ते पिसले असून दोन दिवसांत ‘पूरे घर के बदल डालूंगा’ थाटात मनसेची नवी कार्यकारिणी जाहीर केली जाणार आहे. सोमवारी औरंगाबाद शहरातील तीन मतदारसंघ आणि फुलंब्री व पैठण या दोन अशा पाच मतदारसंघांतील पदाधिकार्‍यांची मते मनसे र्शेष्ठींनी जाणून घेतली. पदाधिकारी फोन घेत नाहीत, काय कार्यक्रम होतात काही समजत नाहीत, अशा तक्रारी करीत त्यांनी र्शेष्ठींच्या मनातील बदलांवर शिक्कामोर्तबच केले.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी चेहर्‍यांची चाचपणीही यानिमित्ताने केली गेली. यामुळे पक्षातील सगळ्याच इच्छुकांना धुमारे फुटले आहेत. शिवसेनेचा मुंबईनंतरचा बालेकिल्ला असलेल्या औरंगाबादेत मनसेला ताकद निर्माण करता आलेली नाही. शिवसेनेला टक्कर देईल असे संघटन नसल्याने मनसेचा तोंडवळा बदलण्याच्या हालचाली सुरू होत्या. त्याला अखेर आज सोमवारचा मुहूर्त लागला. आमदार बाळा नांदगावकर, महिला शाखेच्या राज्याच्या अध्यक्षा शिल्पा सरपोतदार, शिवाजी नलावडे, सरचिटणीस अविनाश अभ्यंकर, आमदार मंगेश सांगळे, संपर्क अध्यक्ष सतीश नारकर आणि गजानन काळे आदींनी दुपारी कुलस्वामिनी मंगल कार्यालयात औरंगाबाद पूर्व, पश्चिम, मध्य, फुलंब्री व पैठण या पाच विधानसभा मतदारसंघांतील कार्यकर्ते, पदाधिकार्‍यांशी चर्चा करीत तक्रारी व सूचना ऐकून घेतल्या. उद्या जिल्ह्यातील इतर मतदारसंघांचा आढावा घेऊन नवी कार्यकारिणी लगेच जाहीर केली जाणार आहे. दोन दिवस आधीपासून विद्यमान पदाधिकार्‍यांना या बदलाची खासगीत पूर्वकल्पना देण्यात आली असून पद गेले तर गडबड करू नका, असा इशाराही देण्यात आला आहे.

आमचे ऐकून घेतले जात नाही : दुपारी 12 नंतर मतदारसंघनिहाय पदाधिकार्‍यांशी चर्चा करण्यात आली. शहरातील पूर्व, पश्चिम आणि मध्य विभागातील कार्यकर्त्यांना पक्षवाढीसाठी काय अपेक्षा आहेत, हे जाणून घेण्याचा प्रयत्न पक्षर्शेष्ठींनी केला. प्रत्येक इच्छुकाने शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. संध्याकाळी उशिरापर्यंत पदाधिकार्‍यांशी चर्चा सुरू होती. त्यानंतर मुंबईहून आलेल्या नेत्यांनी काही उमेदवारांशी वैयक्तिक चर्चाही केली. बैठकीदरम्यान बहुतेक तक्रारींचा सूर हा पक्षात आमचे ऐकून घेतले जात नाही, कार्यक्रमांची माहिती मिळत नाही, स्थानिक विशिष्ट पदाधिकारी विश्वासात न घेता कार्यक्रमांचे नियोजन करतात, असा होता.

कार्यकारिणीची नवी रचना : मनसेची तीन जिल्हाध्यक्ष आणि तीन शहराध्यक्ष असलेली रचना बदलण्यात येणार आहे. मुंबईप्रमाणे एक शहराध्यक्ष आणि विभागनिहाय म्हणजेच मतदारसंघनिहाय जबाबदारी देण्यात येणार आहे. शहरासाठी एक शहराध्यक्ष, दोन विधानसभा क्षेत्रांसाठी उपशहराध्यक्ष, महानगरपालिका असलेल्या शहरात प्रत्येक मतदारसंघासाठी एक विभाग अध्यक्ष अशी नेमणूक करण्यात येईल.

मंगळवारी जिल्ह्यात: शिष्टमंडळ मंगळवारी सिल्लोड, कन्नड, वैजापूर येथील पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी चर्चा करणार असून जालन्याला जाईल.

राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा प्रवेश : सोमवारी सकाळपासूनच शहरात मनसेच्या पदाधिकार्‍यांची गर्दी सुभेदारी येथे झाली. नांदगावकर, सरपोतदार आदींनी सकाळी दहा वाजेच्या सुमारास स्थानिक पदाधिकार्‍यांशी चर्चा केली. याच वेळी गंगापूर तालुक्यातील फुलशेवरा येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बादशाह पटेल व त्यांच्या सोबत शेकडो मुस्लिम कार्यकर्त्यांनीदेखील मनसेत प्रवेश केला.

औरंगाबादवर मी नाराजच- बाळा नांदगावकर
बाळा नांदगावकर यांनी पत्रकारांशी बोलताना औरंगाबादेतील पक्षाच्या कामगिरीवर नाराज असल्याचे स्पष्ट सांगितले. त्यांनी मांडलेले मुद्दे
>औरंगाबादमध्ये पक्षाची बांधणी चांगली झालेली नाही. मी स्वत: खूप नाराज आहे. काही कार्यकर्ते व्यक्तिगत काम करतात.
>अर्थात पक्षाची बांधणी व्यवस्थित झाली नाही त्याला आम्हीही जबाबदार आहोत; पण आता बदल करण्याची वेळ आली आहे.
>नव्यांना त्यांच्यातील स्पार्क पाहून संधी दिली जाईल. नवे चेहरे शोधण्यासाठीच ही मोहीम आहे. पण आम्ही जुन्यांचाही सन्मान करू.
>इतर पक्षांतील अनेक जण मनसेत यायला तयार आहेत. शिवसेना, काँग्रेसमधीलही काही आहेत. योग्य वेळी बघू; पण येणार्‍यांना मेरिटवरच संधी दिली जाणार आहे.
>कार्यकारिणीच्या रचनेतही सुसूत्रता आणण्यासाठी बदल केले जातील. दोन दिवसांत मते जाणून लगेच नवीन कार्यकारिणी येथेच जाहीर करण्याचा विचार आहे.