आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद- काँग्रेस-राष्ट्रवादी घोटाळ्यात, शिवसेना बेचैनीत, भाजप कोंडीत, तर आरपीआय बुचकळ्यात, अशी महाराष्ट्राच्या राजकीय पक्षांची स्थिती आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी मनसे एकटा जीव सदाशिव असल्याचे मनसे नेते, आमदार बाळा नांदगावकर यांनी सांगितले. पदाधिकार्यांनी दुष्काळाविरुद्ध लढण्यासाठी कामाला लागावे, असे आवाहनही त्यांनी केले.
जायस्वाल हॉल येथे गुरुवारी (24 जानेवारी) निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यात ते बोलत होते. पक्षाचे सरचिटणीस अविनाश अभ्यंकर, सहकार सेनेचे शिवाजी नलावडे यांची प्रमुख उपस्थिती होती. नांदगावकर म्हणाले की, दुष्काळाच्या खाईत सापडलेल्या जनतेला मदत करण्यात सरकार फेल ठरले आहे. इतर पक्षांना काय करावे हेच समजत नाही. त्यामुळे मनसे काय करू शकते, हे सिद्ध करण्याची वेळ आली आहे.
आता कान उपटायची वेळ
औरंगाबादेतील मनसे पदाधिकार्यांच्या गटातटाविषयीही त्यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, तुमचे कितीतरी वेळा कान टोचले. मात्र, फरक पडला नाही. आता कान उपटायची वेळ आली आहे. जे पक्षात राजकारण करत होते. त्या आमदारांना पक्षाबाहेरचा रस्ता दाखवला आहे. त्यामुळे राहिलेल्यांनी नीट विचार करावा. पक्षात शक्ती आहे. कार्यकर्त्यांचा पाठिंबा आहे, पण ही ताकद विखुरली गेली आहे, असेही मत त्यांनी व्यक्त केले. राज ठाकरेंची एक मार्चला औरंगाबादला जाहीर सभा होणार आहे. त्यानंतर पदाधिकार्यांनी पुनर्रचना करण्यात येईल. जिल्ह्यातील अतिदुष्काळग्रस्त भागासाठी टँकर आणि चार्या छावण्यांचे उद्घाटन करण्यात येणार आहे, अशीही माहिती त्यांनी दिली.
महापौर,आयुक्तांना गाळ भेट देणार
औरंगाबाद शहर आणि परिसरात सुमारे चारशे विहिरी आहेत. त्यातील गाळ काढण्यासाठी मनपा अधिकार्यांना अनेक निवेदनेही देण्यात आली. त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे आता मनसचे कार्यकर्ते गाळ काढून तो महापौरांना आणि आयुक्तांना भेट देतील. या विहिरींचे पाणी काही वसाहतींना टँकरद्वारे दिले जाणार आहे, असे औरंगाबादचे मनसे संपर्क अध्यक्ष गजानन काळे यांनी सांगितले. दुसरे संपर्क अध्यक्ष सतीश नारकर यांनीही मार्गदर्शन केले.
या वेळी विद्यार्थी सेनेचे राज्याचे उपाध्यक्ष राजेश येरुणकर, जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर, भास्कर गाडेकर, डॉ. सुनील शिंदे, शहराध्यक्ष सतनामसिंग गुलाटी, अरविंद धीवर, डॉ. शिवाजी कान्हेरे, गजानन काळे, गणेश वानखेडे, विद्यार्थी सेनेचे नगरसेवक राज वानखेडे, मनविसेचे जिल्हाध्यक्ष गौतम आमराव, सुमीत खांबेकर, वैभव मिटकर, महिला संघटनेच्या नूतन जैस्वाल, मंगला ठोंबरे, रूपाली पवार आदींची उपस्थिती होती. गुलाटी यांनी प्रास्ताविक केले. धीवर यांनी सूत्रसंचालन केले.
हर्षवर्धन जाधवचा समाचार
मनसे सोडून गेलेले आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यावरही त्यांनी टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, उमेदवारी देण्यासाठी पाच लाख रुपये घेतले, असा आरोप त्यांनी आमच्यावर केला. मात्र, जेव्हा पोलिसांनी मारले होते. तेव्हा विधिमंडळाचे सभागृह आम्हीच डोक्यावर घेतले. मारहाण करणार्या पोलिस अधिकार्याला निलंबित करायला भाग पाडले. राज ठाकरे यांनी औरंगाबादेत निषेध सभा घेतली. त्याच सभेला पंधरा लाखांवर खर्च आला. खरे तर जिल्हा परिषदेच्या सभापतिपदासाठी हर्षवर्धनने गौतम शिरसाटकडे दहा लाख रुपये मागितले होते. त्यापैकी तीन लाख रुपये घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.