(नियमित शिक्षणाधिकाऱ्याच्या मागणीसाठी मनपासमोर मनसेने आंदोलन केले.)
औरंगाबाद- शिक्षण विभागाला नियमित शिक्षणाधिकारी नसल्याने विद्यार्थ्यांचे शिक्षकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे शिक्षणाधिकारी नियुक्त करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने गुरुवारी मनपासमोर ‘मनपा शिक्षणाधिकारी हरवला, कुणाला तो सापडला!’ असे आंदोलन केले.
संघटनेच्या वतीने मनपा उपायुक्त वसंत निकम यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नियमित शिक्षणाधिकारी निवृत्त झाल्यापासून उपायुक्तांकडे हा कारभार देण्यात आला आहे. त्यामुळे ‘एक ना धड भाराभर चिंध्या’ असा प्रकार या विभागाचा झाला आहे. प्रशासनाकडूनही याकडे लक्ष देण्यात येत नाही. शाळेवर मुलांना पिण्याचे पाणी नाही, शौचालय नाही. शाळांमध्ये रात्रीची दारू जुगाराची शाळा भरते. नियमित शिक्षणाधिकारी असते तर हा प्रकार घडला नसता. त्याचबरोबर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकारी हरवले असल्याचे बॅनर लावून परिसरात आपण यांना पाहिलेत का, असा प्रश्न विचारून मनपात पदाधिकारी, अधिकाऱ्यांसमोर हे पोस्टर लावले. या वेळी राज कल्याणकर, अमोल खडसे, विशाल आमराव, निनाद खोचे, रियाज पटेल, अविराज निकम, शुभम रगडे, विशाल कारभारे, मंदार खोचे, सुजित आव्हाड, संदीप वेताळ, प्रशांत सोनवणे, रूपेश देहाडे, विजय लाळे, अजिंक्य धारकर, अरविंद शेलार, शुभम धंगरे, प्रतीक गायकवाड, आकाश गोंडे, चंदू नवपुते आदींची उपस्थिती होती.