आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मनसेचा विहीर स्वच्छतेचा उत्साह मावळला !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - राज ठाकरे आले आणि त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये स्फुरण भरवले. एकीकडे पक्ष विस्ताराची स्वप्ने पाहत राज महाराष्ट्र पादाक्रांत करत आहेत, तर दुसरीकडे कार्यकर्त्यांचा उत्साह ओसरल्याचे चित्र आहे. आतापर्यंत हाती घेतलेले आंदोलन तडीस न नेण्याची परंपरा मनसेने विहिरीतील गाळ काढण्याच्या अभियानानेदेखील कायम ठेवली आहे. शहरामधील 10 विहिरींतील गाळ काढण्याचे आश्वासन देणार्‍या कार्यकर्त्यांनी फक्त आतापर्यंत तीन विहिरींचा गाळ काढला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गाजावाजा करत सुरू केलेले विहिरीतील गाळ काढण्याचे अभियान तीन विहिरींच्या स्वच्छतेनंतरच थंडावले आहे. जालन्यात घेतलेल्या जाहीर सभेत राज ठाकरे यांनी या उपक्रमाचा आणि कार्यकर्त्यांचे तोंड भरून कौतुक केले. त्यानंतर आंदोलनाला वेग आला होता. मात्र, महिनाभराच्या आतच कार्यकर्त्यांचा उत्साह ओसरल्याचे दिसून येत आहे.

विहिरी पाण्यासाठी सक्षम स्रोत होऊ शकतात हे लक्षात घेऊन प्रशासन जे करू शकत नाही, ते मनसे करून दाखवेल या अ3विर्भावात फेब्रुवारीमध्ये सर्मथनगर येथील विहिरीतील गाळ काढण्यास सुरुवात करण्यात आली. उत्साहाच्या भरात मनपा आयुक्तांना गाळदेखील भेट दिला. अभियानाची चर्चा झाली वरिष्ठांची वाहवा मिळवली. पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी गाळ काढण्याच्या कामास भेट देऊन कौतुक केले. या आंदोलनाला मिळणारे फुटेज पाहून इतर पक्षांनादेखील विहिरीतील गाळ काढण्याची आठवण झाली. मात्र, ज्यांचा उपक्रम आहे त्यांना आता विसर पडत आहे. मनसे कार्यकर्त्यांनी तब्बल एक महिन्यातच या आंदोलनाकडे पाठ फिरवली.

मनसे कार्यकर्त्यांनी अगोदर 20 विहिरींतील गाळ काढून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर 10 विहिरींचा गाळ काढून देऊ, अशी कमिटमेंट केले. दोन महिन्यांत प्रत्यक्ष तीन विहिरींतील गाळ काढला. विशेष म्हणजे तीनपैकी दोन विहिरींचे पाणीसुद्धा नागरिकांपर्यंत पोहोचलेले नाही. हडकोमधील यादवनगर परिसरातील विहिरीतील गाळ काढण्याचे काम राज वानखेडे यांनी सुरू केले होते. ते अद्यापही सुरू आहे. मुकुंदवाडीतील लघुवेतन भागातील विहिरीचा गाळ कार्यकर्त्यांंनी पुन्हा एकदा काढला आहे.