आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन नाही, काम नाही; मनसे उमेदवारांना प्रतीक्षा फक्त ब्ल्यूप्रिंटची

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- समाजातील विविध प्रश्नांवर आंदोलने करणारा प्रमुख पक्ष म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपली ओळख निर्माण केली आहे. मात्र गेल्या पाच महिन्यांत जिल्ह्यामध्ये कुठलेही मोठे आंदोलन झालेले नाही. वरिष्ठ पातळीपासून जिल्हा स्तरापर्यंत कामाची गतीही मंदावली आहे. विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना सर्व इच्छुक उमेदवारांच्या नजरा केवळ राज ठाकरे यांच्या ब्ल्यूप्रिंटकडेच आहेत.
मागील आठवड्यात राज ठाकरे यांनी मुंबईत राज्यभरातील पदाधिका-यांचा मेळावा घेऊन विधानसभेसाठी तयार राहण्याचे आदेश दिले. मात्र स्थानिक पातळीवर सक्षम उमेदवारांची चाचपणी करायला आलेल्या नेत्यांना मराठवाड्यात एकही मास लीडर आढळला नाही. लोकसभेसाठी उमेदवार न दिल्याने औरंगाबादसह मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांत आपली ताकद नसल्याचे संकेत पक्षाने दिल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. गेल्या पाच महिन्यांपासून शहर किंवा जिल्हा कार्यकारिणीने कुठल्याही प्रश्नाला वाचा न फोडल्यामुळे ‘मनसे स्टाइल’ हरवत चालली, असेही बोलले जाते. त्यामुळे नव्या कार्यकारिणीची पाटी कोरीच आहे. शिवाय मनसेतील बहुतांश पदाधिका-यांचा राजकीय अनुभवदेखील इतरांपेक्षा तोकडा आहे. आता सर्वांच्या नजरा राज ठाकरे यांच्या करिश्म्याकडे लागल्या आहेत.
पक्षाबाहेरील नेत्यांना संधी
फेब्रुवारीत टोलनाका प्रश्नावर रास्ता रोको करण्यात आला होता. ते मनसेचे मोठे आंदोलन होते. त्यानंतर कुठलाही प्रश्न हाताळला नाही. मनविसेने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी विविध आंदोलने केली. मात्र विधानसभा निवडणुकीसाठी ती किती महत्त्वाची आहेत, याबाबत शंका व्यक्त आहे. त्यामुळे इतर पक्षांतील मास लीडर्सना मनसेत संधी आहे. पक्षात नव्याने येणा-या कार्यकर्त्यांचे स्वागतच आहे, असे बाळा नांदगावकर यांनी औरंगाबादच्या दौ-यावर असताना या वेळी म्हटले होते.
वॉर्डनिहाय नियोजन

वॉर्डातील समस्यांबाबत आंदोलने सुरू आहेत. उप्रकमही राबवले जात आहेत. येत्या निवडणुकीसाठी संघटनात्मक बांधणीवर भर देण्यात आला आहे. नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचा मनसे कार्यकर्त्यांचा प्रयत्न सुरूच आहे.- ज्ञानेश्वर डांगे, पूर्व विभागाध्यक्ष, मनसे