आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपा, मोबाइल कंपन्यांच्या कृपेने व्हीआयपी नॉट रिचेबल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - ज्योतीनगरातील एका शाळेवर बसवण्यात आलेले मोबाइल कंपन्यांचे एक अनधिकृत टॉवर कधी नव्हे ते मनपाने सील केले. त्यामुळे गेल्या २१ दिवसांपासून या भागात व्होडाफोन तसेच आयडिया या खासगी कंपन्यांचे नेटवर्क नाही. विशेष म्हणजे या परिसरात भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी, निवृत्त न्यायाधीश, विद्यमान आमदार अशी व्हीआयपी मंडळी वास्तव्यास आहे. तरीही मोबाइल कंपन्यांनी ही बाब गांभीर्याने घेतलेली नाही. उलट तुम्हीच प्रयत्न करून पालिकेला सील उघडण्यास सांगा, अशा उलट्या बोंबा सुरू झाल्याचे समोर येत आहे. त्यामुळे येथील मोबाइलधारकांना आता ‘अच्छे दिन कधी येणार’ याची प्रतीक्षा लागली आहे.
अवैध टॉवर असल्याने २१ दिवसांपूर्वी पालिकेने येथील एका शाळेवरील टॉवर सील केले. त्यामुळे परिसरातील नेटवर्क कोलमडले. एक टॉवर सील केल्यानंतर मोबाइल कंपन्यांनी पर्यायी व्यवस्था करणे अपेक्षित होते; परंतु इतक्या कालखंडात त्यांनी काहीही केले नाही. येथील राजकीय पदाधिकारी तसेच अधिकाऱ्यांनी कंपनीशी संपर्क साधला असता तुम्हीच पालिका अधिकाऱ्यांशी बोलून सील काढायला सांगा, असे उलटे त्यांना सांगण्यात आले. किती दिवस हे व्हीआयपी विना नेटवर्क राहू शकतील. तेच काही तरी करतील अन् मोबाइल टॉवरचे सील उघडले जाईल, अशी कंपन्यांची अटकळ असल्याचे समजते.

बीएसएनएलचा आधार : बीएसएनएलया निमशासकीय मोबाइल कंपनीचे नेटवर्क चांगले नसल्याचे सांगत अनेक जण यापासून दूर राहतात; परंतु येथील नागरिकांना आता बीएसएनएल याच कंपनीचा आधार आहे. बहुतांश नागरिकांनी कंटाळून बीसएसएनएलचे नवीन मोबाइल सिम कार्ड खरेदी केले आहे. या निमित्ताने तरी का होईना या परिसरात बीएसएनएल कंपनीला तरी किमान ‘अच्छे दिन’ आले आहेत.

हेच का अच्छे दिन? : अच्छेदिन आनेवाले है, असा प्रचार करत भाजप सत्तेवर आला. तेव्हापासून अच्छे दिन कधी येणार, असा सवाल नागरिक करतात. ज्योतीनगर परिसरात पक्षाचे अनेक जण राहतात. मोबाइलच लागत नसल्याने नागरिक पदाधिकाऱ्यांच्या घरी जाऊन हेच का तुमचे अच्छे दिन, असा सवाल करतात.

तक्रार करूनही उपयोग नाही
गेल्यातीन आठवड्यांपासून घरात माझा मोबाइल लागत नाही. फोन आला तर रस्त्यावर येऊन बोलावे लागते. शेजारी माझ्याकडे येऊन तक्रार करतात. मी कंपनीकडे तक्रार केली; पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. त्यामुळे बीएसएनएलचे कार्ड घेऊन मी संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत आहे. -विजया रहाटकर, महिलाराष्ट्रीय अध्यक्षा, भाजप तथा ज्योतीनगरच्या रहिवासी.

रेल्वेमंत्री प्रभू ताटकळले
भाजप महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर यांना सध्या या नेटवर्क जॅमचा जाम फटका बसतो आहे. दोन दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते. वारंवार प्रयत्न करूनही यश आले नाही. एसएमएस देऊनही रहाटकर यांनी संपर्क साधल्याने अखेर त्यांनी रहाटकर यांची मुलगी कल्याणी हिचा क्रमांक मिळवून संपर्क साधला. तेव्हा केवळ एक टॉवर सील केल्याने राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची कशी आवस्था झाली हे केंद्रीय मंत्र्यांनाही यानिमित्ताने समजले.