आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

म्हणायला आहेत लहान; पण केले असे काम, पोहोचले पोलिस कोठडीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - दहा ते सोळा वयोगटातील चार विधिसंघर्षग्रस्तांना रविवारी पहाटे व्होडाफोन कंपनीचे शोरूम फोडताना क्रांती चौक पोलिसांनी रंगेहाथ पकडले. मोंढा नाका परिसरातील रॉयल एंटरप्रायजेसमध्ये ही चोरी झाली. मुलांकडून 11 मोबाइल संच हस्तगत केले. त्यापैकी दोघांनी दहा दिवसांपूर्वीच चार दुकाने फोडल्याची कबुलीही पोलिसांना दिली. या चौघांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता दोघांची रवानगी बालसुधारगृहात, तर दोघांना पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

दुकाने, व्यापारी प्रतिष्ठाने फोडणार्‍या रॅकेटचा पोलिसांनी रविवारी पहाटे पर्दाफाश केला. सर्वांना चोरी करताना रंगेहाथ पकडले खरे, पण सर्वच जण 10 ते 16 वर्षीय विधिसंघर्षग्रस्त बालक असल्याने पोलिसांनीही आश्चर्य व्यक्त केले आहे. एक मुलगा दहा, दुसरा 12 वर्षांचा, तर तिसरा आणि चौथा मुलगा 15 आणि 16 वर्षांचे आहेत. इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावर चढण्यासाठी त्यांनी पाइपचा आधार घेतला. पहाटे 2.40 वाजता चौघेही रॉयल एंटरप्रायजेसचे (व्होडाफोन) शटर उचकटून 11 मोबाइल लंपास करण्याच्या तयारीत होते. मात्र, पोलिसांना याचा सुगावा लागला. वर चढण्यासाठी त्यांनी अग्निशमन दलाची मदत घेतली. पोलिस आल्याचे लक्षात आल्यानंतर दोघांनी स्वच्छतागृहात लपण्याचा प्रयत्न केला, तर दोन लहान मुले बाहेरील त्रिकोणी भागाच्या पोटमाळ्यात दडून बसली. पण अग्निशमनप्रमुख सी. एल. भंडारे, एच. वाय. घुगे, एन. के. पठाण, राजू निकाळजे आदींच्या मदतीने मुलांना ताब्यात घेतले. त्यानंतर सायंकाळी क्रांती चौक पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक उन्मेष थिटे यांनी न्यायालयासमोर हजर केले. दोन लहान मुलांना बालसुधारगृहात, तर 15 आणि 16 वयाच्या विधिसंघर्षग्रस्तांना पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. मुलांचे पालक असल्याची ओळख पटवण्यात आई-वडिलांना अपयश आल्यामुळे त्यांची बालसुधारगृहात रवानगी केली आहे, अन्यथा त्यांना सोडून देण्याची कायद्यात तरतूद आहे. चौघांचेही तिसरी ते चौथीचे शिक्षण झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. विधिसंघर्षग्रस्तांकडून चोरी करण्यासाठी वापरात येणारे साहित्य आणि मुद्देमाल जप्त केला आहे. दहा दिवसांपूर्वी चौघांपैकी दोघांनी मोंढय़ातील चार दुकाने फोडून होती.या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक थिटे पुढील तपास करत आहेत.

काय म्हणतो ज्युवेनाइल जस्टिस अँक्ट

0अठरा वर्षे पूर्ण होण्यास एकही दिवस बाकी असेल तर अल्पवयीन गृहीत धरण्यात यावे.

0अटक करून त्यांना पोलिस कोठडीत ठेवता येत नाही

0ताब्यात घेताना साध्या वेशातील एका महिला पोलिस कर्मचार्‍यांसह जाणे बंधनकारक

0बालसुधारगृहातील प्रशासनाने अशा विधिसंघर्षग्रस्तांचे समुपदेशन करावे

0 कोर्टाच्या निर्देशानुसार त्वरित आई-वडिलांच्या स्वाधीन करावे