औरंगाबाद- पृथ्वीराजनगरात प्लॉट क्रमांक 32 वर सी. व्ही. राजे हे एका मोबाइल कंपनीचे टॉवर उभे करत आहेत. परिसरातील हे तिसरे टॉवर आहे. 20 मेपासून या कामाला सुरुवात झाली. त्यांच्या घरावर अचानक टॉवर उभे राहत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले आहे. नागरिकांनी हे टॉवर उभारू नये यासाठी त्यांची भेट घेतली. त्यांना टॉवरचे दुष्परिणाम सांगितले. नंतर जवळपास महिनाभर हे काम बंद होते. मात्र गुरुवारी रात्रीतून हे बांधकाम नव्याने आणि अधिक वेगाने सुरू करण्यात आले. शुक्रवारी पहाटे राजे यांच्या इमारतीवर मोठे अँगल्स दिसून आले.
अधिका-यांच्या भेटी व्यर्थ
राजे यांची भेट घेतल्यानंतर येथील नागरिकांनी नगरसेवक प्रल्हाद निमगावकर, वॉर्ड अधिकारी अभंग, इमारत निरीक्षक आरेफ खान, पालिका आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे आणि अतिक्रमण विरोधी पथकाची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. सर्वांनीच कारवाईचे आश्वासन दिले. एकदा आरेफ खान पाहणी करून गेले. त्यांनी टॉवरच्या जागामालकाला नोटिसा बजावण्याचे आश्वासन दिले. असे असतानाही राजे यांनी गुरुवारी मध्यरात्रीपासून टॉवरच्या कामाला पुन्हा सुरुवात केली.
डीबी स्टार तपास
नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्यावर डीबी स्टारने स्वतंत्र तपास केला असता पुढील बाबी समोर आल्या.
मनपाकडून टॉवरची परवानगी घेण्यात आलेली नाही.पालिकेने यासाठी ना हरकत प्रमाणपत्रही दिले नाही.
दाट वस्ती असल्यामुळे भविष्यात टॉवर पडले किंवा शॉर्टसर्किटसारखी एखादी घटना घडली तर अनेकांच्या जीविताला धोका आहे.
या टॉवरजवळ अमानविश्व शाळा आहेत. इथे येणा-या विद्यार्थ्यांना टॉवरचा त्रास होण्याचा धोका आहे.
मनपाकडे एकूण 355 मोबाइल टॉवरची यादी आहे. मात्र, 46 वगळता सर्व अनधिकृत आहेत. पालिकेने केवळ 46 टॉवरलाच ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे.
मोबाइल टॉवरमुळे आरोग्यावर होणा-या परिणामांबाबत न्यूयॉर्क येथे दि बायोइनिशिएटिव्हज 2012 या जागतिक परिषदेत चर्चा करण्यात आली. पाच वर्षांत विविध स्तरांवर याचा अभ्यास करण्यात आला. या वर्षी जानेवारीमध्ये हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. त्यातील महत्त्वाचे मुद्दे
सतत रेडिएशन प्रवर (इलेक्ट्रोमॅग्नेटिक क्षेत्रात) क्षेत्रात राहिल्यामुळे अशक्तपणा जाणवतो.
अशक्त झालेले डीएनए दुरुस्त होण्याची क्षमता संपुष्टात येते.
रोगांशी लढण्याची प्रतिकार क्षमता संपते. निद्रानाश संभवतो.
मेंदूचे विकार, वर्तनाशी संबंधित आजार जडतात.
प्रजनन क्षमता बाधित होते. तणाव वाढतो.
मुले, वृद्ध व गरोदर महिलांना सर्वाधिक धोका. अपंग अपत्य जन्माला येण्याची शक्यता.
नियमांची माहिती नव्हती
मी निवृत्तीनंतर नुकताच औरंगाबादेत आलो आहे. गेल्या वर्षी हे घर बांधले. एअरटेल कंपनीचे लोक माझ्याकडे आले आणि त्यांनी टॉवर उभारण्याचा प्रस्ताव दिला. मी एअरटेलसोबत करार केला आहे. बाकी नियमांची मला माहिती नाही.
- सी. व्ही. राजे, घरमालक