आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मोबाइल 1000’ व्हॅनद्वारे गावोगावी मोफत आरोग्य सेवा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- शासनाकडून ग्रामीण भागात पुरेशा आरोग्याच्या सुविधा पोहोचत नाहीत. त्यामुळे अनेक सामाजिक संस्थांकडून आरोग्याचे उपक्रम राबवले जातात. वोक्हार्ट फाउंडेशनचाही ग्रामीण भागासाठी असाच उपक्रम सुरू आहे. ‘मोबाइल 1000’ असे या उपक्रमाचे नाव आहे. ही मोबाइल व्हॅन औरंगाबाद शहरालगतच्या खेडेगावांमध्ये आठवड्यातील सहा दिवस जाऊन तेथील रुग्णांना मोफत आरोग्याच्या सुविधा देत आहे. हा उपक्रम गेल्या तीन वर्षांपासून यशस्वीपणे सुरू आहे.

वोक्हार्ट फाउंडेशन ही वोक्हार्ट कंपनीची सामाजिक उपक्रम राबवणारी संस्था असून या संस्थेद्वारे भारतात विविध सामाजिक उपक्रम घेतले जातात. त्यामध्ये मोबाइल 1000, मोबाइल 1000 आय, व्हार्फ (एड्सबाबत जनजागृती), आरोग्य तपासणी, आरोग्य केंद्र, डॉ. हेल्थ, जल सेक्योर, बायो-टॉयलेट, खेल-खेल मे व वर्ल्ड पीस आदी उपक्रमांचा समावेश आहे. त्यातील मोबाइल 1000 हा उपक्रम सध्या औरंगाबादेत निवडक गावांमध्ये सुरू असून तो संपूर्ण जिल्हाभरात राबवण्याचे फाउंडेशनचे उद्दिष्ट आहे.

काय आहे मोबाइल 1000? : मोबाइल 1000 ही मोडिसिन व्हॅन असून ती आठवड्यात सहा दिवस विविध गावांमध्ये जाऊन नागरिकांना मोफत आरोग्य सुविधा देते. यात एक एमबीबीएस डॉक्टर व एक सहायक असे दोन जण असतात. सकाळी 9 वाजता ठरलेल्या ठिकाणी ही व्हॅन पोहोचते.

मोफत औषधी : ही व्हॅन गावातील व परिसरातील शेकडो रुग्ण तपासणीसाठी येतात. डॉ. संदीप किंगर रुग्णांची मोफत तपासणी करतात. या व्हॅनमध्ये स्टेथोस्कोप, बीपी अँपरेटस, मधुमेह तपासणी यंत्र, हिमोग्लोबिन टेस्ट किटसह सामान्यपणे उपलब्ध होणारी 35 प्रकारची औषधे उपलब्ध असतात.

आठवड्यातील सहा दिवस सेवा : ही मोबाइल व्हॅन आठवड्यातील सहा दिवस विविध गावांमध्ये जाऊन आरोग्य सेवा देते. सोमवरी बिडकीन, मंगळवारी कसाबखेडा (ता. खुलताबाद), बुधवारी खुलताबाद, गुरुवारी वरझडी, शुक्रवारी रांजणगाव शेणपुंजी आणि शनिवारी चौका येथे ही मोबाइल व्हॅन नागरिकांसाठी उपलब्ध असते. ठरलेल्या दिवशी ज्या गावात व्हॅनचा मुक्काम असतो त्या दिवशी तेथे आजूबाजूच्या इतर गावांमधील नागरिकही तपासणीसाठी येतात.

मोबाइल 1000 आय : शहरातील झोपडपट्टी भागातील नागरिकांसाठी फाउंडेशनतर्फे मोबाइल 1000 आय हा उपक्रम सुरू आहे. यात रुग्णांची मोफत नेत्र तपासणी केली जाते. त्यानंतर गरजूंना नाममात्र 20 रुपये शुल्क आकारून चष्मे दिले जातात. औरंगाबादसह भारतातील 13 शहरांमध्ये हा उपक्रम विविध संस्थांच्या सहकार्याने राबवला जातो. औरंगाबादेत महात्मा गांधी मिशन ही संस्था भागीदार आहे. या व्हॅनमध्ये एक नेत्रतज्ज्ञ आणि एक सहायक असे दोघे असतात.

फाउंडेशनचे इतर उपक्रम : मोबाइल 1000 उपक्रमासह शहरात विविध ठिकाणी आरोग्य शिबिरेही घेतली जातात. नुकतीच साईबाबांची पालखी शहरात आली होती. त्यातील 80 भाविकांची नेत्र तपासणी फाउंडेशनतर्फे करण्यात आली आणि 25 चष्मे वाटण्यात आले. दुसरीकडे एड्सबाबत व्हार्फ हा उपक्रम संपूर्ण भारतात राबवला जातो. लोकांमध्ये जनजागृती आणि क्षमता बांधणी केली जाते. फाउंडेशनतर्फे शुद्ध नावाच्या पाणी शुद्ध करणार्‍या टॅबलेट्स नागरिकांना मोफत दिल्या जातात.