आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'कोमात जाणार्‍या मेंदूला मोबाइल लहरींचा आधार'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - अपघातात मेंदूवर जोरदार आघात झाल्यानंतर मृतावस्थेत जाणार्‍या (कोमा) रुग्णाच्या हृदयापासून विशिष्ट अंतरावर मोबाइल सुरू केल्यास बंद पडत असलेला मेंदू पुन्हा कार्यान्वित होऊ शकतो. मोबाइल संचाच्या विद्युतचुंबकीय लहरींमुळे (इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज) ही किमया साध्य होऊ शकते, असा निष्कर्ष चंदिगडच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल टीचर्स ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटरचे वरिष्ठ संशोधक डॉ. श्याम पटनायक यांनी एका संशोधनातून काढला आहे.

‘अँटेना वीक-2013’ या परिषदेसाठी पटनायक आज (4 जून) शहरात आले. 3 जूनपासून सुरू झालेल्या या परिषदेत डॉ. पटनायक यांनी संशोधनाचे सादरीकरण केले. टेलिकम्युनिकेशनच्या क्षेत्रात दांडगा अभ्यास असलेल्या डॉ. पटनायक यांच्याशी ‘दिव्य मराठी’ने बातचीत केली. या वेळी इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या संशोधनाचा अत्यंत महत्त्वाचा निष्कर्ष त्यांनी सांगितला.

ते म्हणाले, हृदयातून होणार्‍या रक्तपुरवठय़ाच्या बळावर मेंदूचे कार्य चालते. या दोन्ही अवयवांवर विद्युतचुंबकीय लहरींचा मोठय़ा प्रमाणात परिणाम झालेला दिसून येतो. मानवी हृदय या लहरींना काही क्षणांत प्रतिसाद देते. या लहरींच्या माध्यमातून हृदयाचे नियंत्रण होऊ शकते. बंद पडलेल्या हृदयाला कार्यान्वित करण्यासाठी ज्याप्रमाणे‘शॉक’ किंवा पंपिंगचा उपयोग केला जातो, त्याच धर्तीवर या लहरी काम करतात.

सोळा महिला, तेरा पुरुषांवर प्रयोग : चंदिगड येथे पीएचडी करणार्‍या चार विद्यार्थ्यांनी ‘विद्युतचुंबकीय लहरींची कार्यप्रणाली’ या विषयावर संशोधन केले आहे. ते जवळजवळ पूर्णत्वास आले असून त्याचे निष्कर्षही पुढे आले आहेत. विविध वयोगटांतील 16 महिला व 13 पुरुषांवर हा प्रयोग करण्यात आला. मोबाइल संचातून विकरित (सुटलेल्या) विद्युतचुंबकीय लहरी मृतावस्थेकडे वाटचाल करणार्‍या मेंदूच्या संपर्कात आल्यास विविध भाग हृदयाद्वारे नियंत्रित करतात हे प्रयोगाअंती सिद्ध झाले. पुढील संशोधनासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची मदत घेतली जात असून मोबाइलच्या लहरी किती अंतरावर ठेवल्या तर त्याचा मृतावस्थेत जाणार्‍या रुग्णाला फायदा होईल, याचा गणितीय तर्क लावला जात आहे.


अँटेनाचा वापर तारणार : स्वाइन फ्लूसारख्या आजारामध्ये रुग्णाची प्रकृती तासातासाला घडते-बिघडते. अशा आजारांसाठी ‘अँटेना कम्युनिकेशन’चा मोठय़ा प्रमाणावर उपयोग होऊ शकतो. शरीराच्या एका भागात हा अँटेना प्लांट करून शरीरात होणारा बदल स्क्रीनवर पाहण्याची सोय यामुळे होऊ शकते. यासाठी स्वतंत्र एसआयएमबीओ ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे.


कोण आहेत डॉ. पटनायक ?
डॉ. पटनायक हे चंदिगडच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल टीचर्स ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटरचे वरिष्ठ संशोधक आहेत. 22 वर्षांच्या कारकीर्दीत ते पीएचडीच्या अनेक विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक राहिले आहेत. ‘बायो इन्स्पायर्ड सॉफ्ट कम्युटिंग अँटेना डिझाइन अँड अँनालिसिस’ या विषयावर त्यांनी विदेशात राहून संशोधन केले असून शोधनिबंध सादर केले आहेत. संशोधनकार्यात महाराष्ट्रातील डॉ. के. एम. बकवाड, जे. जी. जोशी, एम. आर. लोहकरे, डी.जी.जाधव, एस.कस्तुरे या पीएचडीधारक विद्यार्थ्यांनी सहकार्य केले आहे.