आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी लाट ओसरल्याचे पाहून आघाडीने घेतला मोकळा श्वास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पदवीधर निवडणुकीची मतमोजणी संपण्याआधीच विजयाचे संकेत मिळताच राष्ट्रवादीच्या तंबूत एक संदेश फिरत होता. ‘सतीश चव्हाण तो अब झांकी है, विधानसभा बाकी है,’ त्यालाच जोडून मध्य विधानसभा मतदारसंघातून इच्छुक असलेल्या विनोद पाटील यांच्या समथर्कांनी तर सतीश चव्हाणांच्या झांकीला लागून ‘विनोद पाटील अभी बाकी है’ असे संदेश फिरवले. एकूणच मोदी फॅक्टर रोखण्यात यश आल्याने राष्ट्रवादीच्या गोटात आनंदोत्सव होता, तर मोदी फॅक्टर कसा ओसरला, यावर विचार करण्यात भाजप कार्यकर्ते अजून व्यस्त आहेत. दुसरीकडे मोदी लाट असतानाही जिंकू शकलो. केंद्राच्या दरवाढीच्या निर्णयामुळे मोदी लाट ओसरेल अन् विधानसभाही जिंकू असा विश्वास काँग्रेस आघाडीच्या सदस्यांना आहे.

अवैध ठरलेली साडेबारा हजार मते आमचीच होती, असा दावा भाजपकडून करण्यात येतो. भाजपचे शिरीष बोराळकर यांना मिळालेल्या वैध मतांमध्ये साडेबारा हजार समाविष्ट केले, तरी ते सतीश चव्हाण यांची बरोबरी करू शकत नाहीत. अन्य 21 उमेदवारांमध्ये सहा हजार मते विभागली गेली. याचाच अर्थ ना मोदी फॅक्टर चालला, ना गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मतदान झाले.

अवघ्या दीड महिन्यांत मोदी फॅक्टर संपुष्टात तर आला नाही ना, अशी शंका कार्यकर्ते उपस्थित करू लागले आहेत. रेल्वे भाडेवाढीचा कटू निर्णय मोदी सरकारने घेतला. असेच काही निर्णय येत्या तीन महिन्यांच्या काळात घेतले गेले, तर राज्यातील सत्ता ताब्यात राहू शकते, असा विश्वास आघाडीच्या कार्यकर्त्यांना आहे. त्यामुळे औरंगाबाद शहरातून एक आमदार देण्यासाठी उत्सुक असलेल्या राष्ट्रवादीने आता मध्य मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे. लोकसभा निवडणुकीत मोदी लाट असतानाही या मतदारसंघातून काँग्रेस उमेदवाराला अडीच हजारांची आघाडी मिळाली होती. शहर कार्याध्यक्ष विनोद पाटील यांनी या मतदारसंघावर दावा केला आहे. पदवीधरचा निकाल विरुद्ध गेला असता तर चव्हाण मध्यमधून लढण्याची तयारी ठेवून होते. मात्र चव्हाण निवडून आल्याने त्यांच्याइतकाच आनंद विनोद पाटील यांनाही झाला. गतवेळी येथून राष्ट्रवादीने कदीर मौलाना यांंना उमेदवारी दिली होती. शिवसेना उमेदवाराला तिस-यास्थानावर लोटत ते दुस-यास्थानी राहिले होते. त्यांनीही अजून दावा सोडलेला नाही.
मध्यमधून जिंकू
- मोदींची लाट असतानाही आम्ही पदवीधर मतदारसंघ स्वत:कडे राखू शकलो. विधानसभेसाठी मोदी लाट राहणार नाहीच. त्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त आमदार आमच्याच आघाडीचे असतील. मध्यमध्ये मोदी फॅक्टर असतानाही आम्ही आघाडी घेतली होती. या वेळी तेथून विजय नक्की असेल. - विनोद पाटील, शहर कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

कमी वेळ
- आम्हाला प्रचाराला कमी वेळ मिळाला. त्यातच गोपीनाथ मुंडे यांचे आकस्मिकनिधन झाले. त्यामुळे प्रचार होऊ शकला नाही. मात्र या निवडणुकीचा संबंध विधानसभेसाठी जोडणे योग्य ठरणार नाही. तेव्हा चित्र वेगळे असेल. प्रवीण घुगे, प्रदेश संघटक भाजप.