आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘अबकी बार मोदी, बार बार मोदी’,फटाक्‍यांची आ‍तषबाजी, मिठाई वाटप तर मुस्‍लीम बांधवांची प्रार्थना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर उस्मानपुरा येथील भाजप कार्यालयात जल्लोष करण्यात आला. कार्यकर्त्यांना शपथविधीचा सोहळा पाहता यावा म्हणून येथे एलसीडीची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यकर्त्यांनी फटाके फोडून तसेच पेढे वाटून आनंद साजरा केला. मोदी गोपनीयतेची शपथ घेत असताना ‘अबकी बार मोदी, बार बार मोदी’, ‘अच्छे दिन आनेवाले हैं’ अशा घोषणा देण्यात आल्या. गोपीनाथ मुंडे शपथ घेतानाही जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मोदींच्या मंत्रिमंडळात मुंडे आणि जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे यांना स्थान मिळाल्यामुळे मराठवाड्याला न्याय मिळाल्याची भावना प्रदेश चिटणीस अतुल सावे यांनी व्यक्त केली.

आता मराठवाडा आणि राज्याच्या विकासाला चालना मिळेल. शिवाय दोन मंत्र्यांमुळे औरंगाबादचा नगरोत्थान योजनेत समावेश व्हावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. महिला आघाडीच्या शहराध्यक्ष माधुरी अदवंत म्हणाल्या, हा आनंद शब्दांत सांगणे कठीण आहे. सोन्याचे भाव कमी होत असून रुपया मजबूत होत आहे. त्यामुळे सरकार प्रत्यक्ष काम करण्याअगोदरच चांगले दिवस येत असल्याची भावना अदवंत यांनी व्यक्त केली. नगरसेविका रेखा पाटील यांनी मंत्रिमंडळात महिलांना चांगले स्थान मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.