आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रावले बोलले ते योग्यच; पण त्यांच्या मार्गाने जाणे अशक्य!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शिवसेना नेते मोहन रावले जे बोलले ते योग्यच; पण आम्ही मात्र त्यांच्या मार्गाने जाऊ शकत नाही, अशा शब्दांत शहरातील शिवसैनिकांनी त्यांची असर्मथता व्यक्त केली आहे.
पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे सहायक मिलिंद नार्वेकरच शिवसेना चालवतात असा आरोप करून शिवसेनेला मोहन रावले यांनी ‘जय महाराष्ट्र’ केला. त्यावर ‘दिव्य मराठी’ने औरंगाबादेतील बहुतांश शिवसैनिकांच्या भावना जाणून घेतल्या. यावर त्यांनी रावलेंच्या आरोपांशी सहमती दर्शवली. ‘त्यांनी केलेली टीका शंभर टक्के खरी आहे. मात्र, आम्ही त्यावर उघडपणे बोलू शकत नाही. कधीतरी नार्वेकरांचे खरे रूप उद्धवांना कळेल आणि त्यानंतर चित्र बदलेल’, अशी आशा व्यक्त करत तूर्तास आम्ही रावलेंच्या मार्गाने जाणार नाही, असे त्यांनी सांगितले.
मधुकर सरपोतदार, प्रमोद नवलकर, विलास भानुशाली, दिवाकर रावते या नेत्यांच्या नेतृत्वात औरंगाबादेत शिवसेनेची बांधणी झाली. इतरही अनेक नेते औरंगाबादच्या संपर्कात असतात. मात्र, रावले यांचा फारसा संबंध आला नाही. मुंबईतही त्यांच्याशी काही स्थानिक नेतेमंडळी अन्य कुणाचा त्यांच्याशी संपर्क नव्हता. असे असले तरी काल रावले यांनी नार्वेकरांवर सोडलेले टीकास्त्र शिवसैनिकांमध्ये चर्चेचा विषय होते.
काही जणांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर त्यांचे मन मोकळे केले. नार्वेकरांमुळे आणखी किती बळी जाणार, असा सवालही त्यांनी केला. रावले मोठे नेते होते. त्यांनी मुंबईत पक्षाला मजबूत केले. नार्वेकरांच्या एककल्ली कारभाराला कंटाळलेले अनेक नेते आहेत. ते सर्वजण बाहेर पडले तरी नेतृत्वाला ते चालणार आहे काय? एकट्या नार्वेकरसाठी असे का होत आहे, असाही त्यांचा प्रश्न आहे.
नार्वेकरांचा तेवढा अनुभव नाही : औरंगाबादेतील मोजके नेते मातोवर जातात. नगरसेवक झाल्यानंतर किंवा त्यानंतर पदाधिकारी झाल्यानंतर येथील मंडळींना मातोवर जाण्याचा योग येतो, पण मातोची वेळ फारच कमी जण घेतात. औरंगाबाद दौर्‍यादरम्यान अनुभवलेले नार्वेकर, शिवसेना सोडताना प्रदीप जैस्वाल यांनीही केलेला उद्धार यामुळे नार्वेकर परिचित आहे.
>औरंगाबाद मध्य मतदारसंघातून 2009 मध्ये प्रदीप जैस्वाल यांना उमेदवारी मिळेल, असे चित्र होते. मात्र नार्वेकरांशी थेट संपर्क असल्यामुळे वाटाघाटीने ऐनवेळी विकास जैन उमेदवार झाले.
>महापालिकेचे विविध उपक्रम पाहण्यासाठी ऑक्टोबर 2010 मध्ये नार्वेकर उद्धव ठाकरेंसोबत शहरात आले होते. त्या वेळी नार्वेकरांची भाषा येथील आमदार, खासदारांसोबत अरे-कारेची होती. उद्धव ठाकरे जेथे तुम्ही-आम्ही म्हणत तेथे नार्वेकर अरे-कारे करत असल्यामुळे येथील सैनिकांना नार्वेकर काय चीज हे समजले.
ठाकरेंच्या मोबाइलचा गैरवापर
उद्धव ठाकरे कोणाचेही फोन घेत नाहीत. मात्र उद्धव ठाकरेंचा फोन नार्वेकरकडे असतो आणि त्याचा त्याने ‘चांगला वापर’ करून घेतल्याचे एका शिवसैनिकाने उपरोधिकपणे खासगीत बोलताना सांगितले. उद्धव ठाकरेंना जो फोन करतो तो नार्वेकरकडे जातो. नार्वेकर त्याच्याशी थेट संवाद साधून काय ती बोलणीच करून टाकतात. अनेक गोष्टी उद्धवपर्यंत जात नाहीत. त्यामुळे मोबाइलचा उत्तम वापर त्यांनी करून घेतला असून त्यामुळेच हा माणूस वर्षातून एक महिना विदेशात राहू शकतो, असे एका वरिष्ठाने सांगितले.