औरंगाबाद- मोक्का कायद्यांतर्गत एप्रिल 2012 पासून हसरूल कारागृहात शिक्षा भोगणारा ज्ञानेश्वर रावसाहेब पिंपळे (27, रा. चिकलठाणा) हा मंगळवारी (24 डिसेंबर) रात्री नऊच्या सुमारास कारागृह परिसरातून पोलिसांच्या तावडीतून पळाला. याप्रकरणी पोलिस आयुक्त संजयकुमार यांनी मुख्यालयातील सहायक फौजदार गोपीनाथ गंगावणे, जमादार सुनील प्रधान आणि शिपाई विश्वास निकम यांना तत्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले.
घरफोडी, दरोडा, जबरी चोर्या करणार्या ज्ञानेश्वरविरुद्ध शिर्डी पोलिस ठाण्यात वेगवेगळ्या स्वरूपाचे 6 गुन्हे दाखल आहेत. एप्रिल 2012 मध्ये शिर्डी पोलिसांनी पिंपळेसह त्याच्या साथीदारांना अटक केली. 24 एप्रिल 2012 रोजी ज्ञानेश्वर व त्याच्या साथीदारांची हसरूल कारागृहात रवानगी करण्यात आली. त्याला तीन गुन्ह्यांत न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मात्र, आणखी तीन गुन्ह्यांत तो हसरूल कारागृहात शिक्षा भोगत आहे. राहता येथे घरफोडी केल्याच्या गुन्ह्यात (कलम 457 आणि 380) त्याला मंगळवारी न्यायालयात हजर केले जाणार होते. त्यामुळे मुख्यालयातील सहायक फौजदार गोपीनाथ गंगावणे, एसएलआर रायफलधारी जमादार सुनील प्रधान आणि शिपाई विश्वास निकम यांनी सकाळी 8 वाजता एसटीने राहता येथे नेले. राहता न्यायालयासमोर हजर केल्यानंतर त्याला सोबत घेऊन रात्री आठच्या सुमारास तिघेही मध्यवर्ती बसस्थानकावर उतरले. तेथून सिटी बसने हसरूल कारागृहाजवळ उतरले. या वेळी ज्ञानेश्वरच्या हाताला बेड्या ठोकल्या होत्या, तर बेडीला बांधलेली दोरी जमादार प्रधान यांच्या हातात होती. कारागृहाकडे पायी जाताना चेक पॉइंटपासून 15 मीटर अंतरावर गेल्यानंतर प्रधान यांच्या हाताला हिसका देत त्याने लोखंडी कठड्यावरून उडी मारत पळ काढला. हा प्रकार घडताच तिघांनीही पकडा-पकडा अशी आरोळी ठोकली. मात्र, अंधार असल्याने काहीही दिसले नाही आणि गर्दीचा फायदा घेऊन ज्ञानेश्वर दोरी आणि बेडीसह निसटला, असे तिघांचे म्हणणे आहे. दरम्यान, हसरूल कारागृहाच्या परिसरात 10 ते 15 मीटरपर्यंत प्रत्येकी एक ते दोन पोलिस तैनात करण्यात आलेले आहेत. दरम्यान, कारागृहातील आरोपी कोणत्या गुन्ह्यातील आहे याची माहिती बंदोबस्तासाठी नेमण्यात आलेल्या पोलिसांना दिली जाते. अशीच माहिती मंगळवारीदेखील पोलिस मुख्यालयातील पोलिसांना कारागृह पोलिसांनी दिली होती. याप्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
वर्षभरात मोक्काचा दुसरा आरोपी पळाला
21 नोव्हेंबर 2012 रोजी अहमदनगर येथील मोक्कातील आरोपी विजय सर्जेराव बढे (रा. चिंचपूर), दीपक दत्तात्रय जावळे आणि अभय भास्कर पोहरे (दोघेही रा. अहमदनगर) यांना रात्री सव्वाआठच्या सुमारास मध्यवर्ती बसस्थानकातून पोलिस मुख्यालयाचे सशस्त्र सहायक फौजदार बी. एम. बढिया, जमादार एन. जे. राठोड, के. एम. नाईक, सोनटक्के, शिपाई जी. ए. शेळके मुख्यालयाकडे पायी घेऊन जात होते. या वेळी आरोपीने बढिया आणि शेळके यांच्या डोळ्यांत मिरची पूड फेकत पळ काढला होता. दुसर्या घटनेत 11 डिसेंबर 2013 रोजी संजय विठ्ठल मघाडे (22, रा. कबीरनगर, उस्मानपुरा) या दारुड्याला उस्मानपुरा पोलिसांनी पकडले होते. रात्री वैद्यकीय तपासणी केल्यानंतर हातात बेड्या असताना तो पोलिस ठाण्यातून नजर चुकवत पसार झाला. अद्याप तो पोलिसांच्या हाती लागलेला नाही.
आरोपीचा शोध सुरू
पळालेल्या आरोपीचा शोध सुरू आहे. कर्तव्यात कसूर करणार्या तिन्ही कर्मचार्यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे.
-सोमनाथ घार्गे, पोलिस उपायुक्त.