आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोंढा नाका उड्डाणपूल १० दिवसांत होणार वाहतुकीसाठी खुला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोंढा नाका उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात असून १३ जुलैपर्यंत वाहतुकीसाठी खुला होणार आहे. छाया : मनोज पराती - Divya Marathi
मोंढा नाका उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात असून १३ जुलैपर्यंत वाहतुकीसाठी खुला होणार आहे. छाया : मनोज पराती
औरंगाबाद - शहराच्या सौंदर्यात भर घालून वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या उड्डाणपुलांचे काम प्रगतिपथावर असून मोंढा नाका उड्डाणपूल येत्या दहा दिवसांत (१३ जुलैपर्यंत) वाहतुकीसाठी खुला होणार आहे, तर महावीर चौक आणि नाईक काॅलेजसमोरील पुलांचे काम जानेवारी २०१६ मध्ये पूर्ण होणार आहे. वर्षभरापूर्वी सुरू झालेल्या या पुलांचे काम ६० टक्के पूर्ण झाल्याची माहिती रस्ते विकास महामंडळाचे उपअभियंता उदय बर्डे यांनी दिली.

मृत्यूचा सापळा म्हणून ओळख असलेल्या जालना रोडवरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी रस्ते विकास महामंडळाने मोंढा नाका, वसंतराव नाईक चौक व महावीर चौकातील पुलांचे काम हाती घेतलेले आहे. महापालिकेच्या वतीने भूसंपादनाचे काम वेळेत पूर्ण न झाल्याने या कामांची गती मंदावली होती. असे असले तरी वेळेत काम पूर्ण करण्यासाठी महामंडळाने व्यापाऱ्यांशी चर्चा करून पुलाचे काम सुरू ठेवले. मोंढा नाका उड्डाणपुलाचे काम सुरू असताना त्या भागातील व्यापारी व सिंधी कॉलनीतील नागरिकांनी आंदोलने केली होती. मात्र, महामंडळाने तडजोड करत व्यापाऱ्यांची समजूत काढली अन् काम सुरूच ठेवले. परिणामी, या पुलाचे काम वेळेत पूर्ण करण्यात महामंडळास यश आले. हे काम अंतिम टप्प्यात असून पुलावरील रस्त्याचे काम झाल्यानंतर आठ दिवसांत खुला केला जाणार आहे. काम ३० जूनपर्यंत पूर्ण करायचे होते.

अडचणी आल्या तरी काम वेळेत पूर्ण
पुलाचे काम पूर्ण झाले असून दहा दिवसांत वाहतुकीसाठी खुला होणार आहे. ३० जूनपर्यंत कामाची मुदत दिली होती. काही अडचणी आल्या तरी वेळेत पूर्ण करण्याचे काम आम्ही केलेले आहे. -उदय बर्डे, उपअभियंता, एमएसआरडीसी.