आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मताला ५१० अॅडव्हान्स, दहाच्या नोटेवर स्वाक्षरी! शिवसेना उमेदवाराचा अजब फंडा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - औरंगाबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीत काळ्या पैशांचा अक्षरश: पूर वाहत अाहे. गेल्या दोन दिवसांत शहरात घडलेल्या अनेक घटना आणि पोलिसांत दाखल झालेल्या फिर्यादी तेच सांगत आहेत. मतदारांना भुलवण्यासाठी उमेदवारांकडून एकापेक्षा एक भन्नाट कल्पना लढवल्या जात असून कबीरनगरमधील शिवसेना उमेदवाराने तर मतदारांची ओळखपत्रे जमा करून प्रत्येकी पाचशे दहा रुपये अॅडव्हान्सही दिला आहे.
काहीही करून ही निवडणूक जिंकायचीच अशा ईर्षेने मैदानात उतरलेल्या उमेदवारांनी मतदारांना ‘आपले’से करण्याच्या नामी शकली लढवल्या आहेत. साम, दाम, दंड आणि भेद नितीचा सर्रास वापर करण्यात आला आहे. मात्र कबीरनगर वॉर्डातील शिवसेना उमेदवार विशाल इंगळे यांनी कहरच केला आहे.

इंगळे यांनी एक हजार जणांचे सोमवारी मतदान ओळखपत्रे जमा करून घेतली. त्यावरील क्रमांक नोंदवून, त्यासोबत पाचशे दहा रुपये मतदारांना अॅडव्हान्स म्हणून दिले. दहा रुपयांच्या नोटांवर स्वाक्षरी करून त्यावरील क्रमांकाचीही कार्यकर्त्यांनी नोंद घेतली आहे.
निवडून आल्यास मतदाराची ओळख पटवण्यासाठी दहा रुपयांची नोट जमा करून एक हजार रुपये देण्यात येणार आहेत. इटखेडा येथील रेयाॅन इंटरनॅशनल शाळेजवळ मंगळवारी पैसेवाटप केले जात होते. शिवाय एमटीडीसी कार्यालयाजवळही ५१० रुपये देण्यात येत होते. याबाबत सातारा आणि उस्मानपुरा पोलिस ठाण्यात तक्रारी दिलेल्या आहेत. इंगळे यांनी दोन दिवसांपासून पैसेवाटपाचे सत्र सुरू केल्याचा आरोप अपक्ष उमेदवार बाबा गाडे यांनी केला आहे.

आज मतदान
औरंगाबाद आणि नवी मुंबई महानगर पालिकेच्या प्रत्येकी १११ वॉर्डांसाठी बुधवारी मतदान होत आहे. औरंगाबादेत ९०७ उमेदवार रिंगणात असून ६५७ मतदान केंद्रांवर ८ लाख १५ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सकाळी साडेसात वाजता मतदानाला प्रारंभ होणार असून साडेपाच वाजता मतदान संपेल.
चोरीचा मामला
कुठलाही उमेदवार खुलेआम पैसे देत नाही. छुप्या पद्धतीने पैसे दिले जातात. घरात बसून पैसे वितरित केले जात असतील तर भरारी पथकालाही काही मर्यादा आहेत. त्यामुळे काही ठिकाणी कारवाई करू शकलो नाही, तर काही प्रकरणांत आचारसंहिता भंगाचे गुन्हे नोंदवले आहेत.
-प्रकाश महाजन, आयुक्त तथा मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी