आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निवडणुकांच्या रणधुमाळीत 'मनी पॉवर' आव्हानात्मक - राज्य निवडणूक आयुक्त सहारिया

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - निवडणुकांत मनी पॉवर हा सर्वांत मोठा आव्हानाचा मुद्दा आहे. पैशांचा मोठ्या प्रमाणात गैरवापर होतो. अनेक उमेदवार खरा खर्च सांगत नाहीत, असे मत राज्य निवडणूक आयुक्त जे.एस.सहारिया यांनी गुरुवारी (दि.१७) औरंगाबादेत मांडले. विभागीय आयुक्त कार्यालयात त्यांनी निवडणूकविषयक आढावा बैठक घेतली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये प्रभाग रचनेसाठी गुगल मॅपचा वापर करण्यात येणार असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

औरंगाबाद विभागामध्ये मार्च २०१७ अखेर मुदत संपणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जिल्हा परिषदा, ७६ पंचायत समिती, ४६० ग्रामपंचायती ४६ नगरपालिकांचा समावेश आहे. या निवडणुकांसंदर्भात आढावा घेण्यासाठी सहारिया शहरात आले होते. ते म्हणाले की निवडणुकांमध्ये पारदर्शकता येण्यासाठी निवडणूक प्रक्रियेमध्ये संगणकाचा जास्तीत जास्त वापर करण्यात येणार आहे. गुगल मॅपच्या आधारे प्रभागरचना केली जाणार आहे. मतदार नोंदणी, दुरुस्ती याद्या अद्ययावत करण्याच्या तयारीला सुरुवात करण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या सहा महिन्यांपूर्वीच तयारी करण्यामागे आचारसंहितेमुळे विकास कामात अडसर निर्माण होऊ नये हा प्रमुख हेतू असल्याचेही त्यांनी सांगितले.

निवडणूक खर्चाचे निकष बदलणार
राज्यात लोकसभा, विधानसभा निवडणुकीसह स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी प्रतिमतदार देण्यात येणाऱ्या खर्चाचे निकष बदलण्याचा प्रस्ताव सरकारकडे देण्यात आला आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी प्रतिमतदार १०० रुपये दिले जातात. तर मनपा, न.प.निवडणुकीत हाच खर्च ३० ते ३५ रुपये प्रतिमतदार असतो. ग्रामपंचायतीसाठी तो २० रुपये आहे. हे निकष चुकीचे असून ते बदलले पाहिजे असे मत सहारिया यांनी व्यक्त केले. विभागीय आयुक्तालयात घेण्यात आलेल्या या बैठकीत विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट,मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, उपायुक्त विजयकुमार फड, जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडे, जि. प. सीईओ अभिजित चौधरी उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...