आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिनाभराच्या पावसाने केली पुढील 15 दिवसांची तजवीज

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- गेल्या महिनाभरात झालेल्या समाधानकारक पावसाने पुढील पंधरा दिवसांची चिंता दूर झाली आहे. जिल्ह्यातील पेरण्या पूर्ण झाल्या असून भाजीपाला उत्पादन वाढीलाही त्याचा फायदा होणार आहे. पंधरा दिवसांत बाजारात भाजीपाल्याची आवक वाढेल आणि पर्यायाने गगनाला भिडलेले दर कमी होतील, असा अंदाज कृषितज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

15 जून ते 15 ऑगस्टदरम्यान भाजीपाल्याचे दर नेहमी वाढलेले असतात. जिल्ह्यात कन्नड, फुलंब्री, वैजापूर भागात सर्वाधिक भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जाते. गेल्या महिनाभरातील पावसामुळे येत्या पंधरा ते वीस दिवसांत भाजीपाला बाजारात येण्यास सुरुवात होईल, अशी शक्यता कृषी अधिकारी उदय देवळाणकर यांनी व्यक्त केली. जिल्ह्यात शेतकर्‍यांनी कापूस, मका, ज्वारी, तूर इत्यादी पिके घेण्यास पसंती दिली आहे. जिल्ह्यात सहा लाख 6 हजार 400 हेक्टरपैकी 6 लाख 3 हजार 100 हेक्टरवर पेरणी झाली आहे. या वर्षी तीन लाख 74 हजार 100 हेक्टरवर कापसाची लागवड करण्यात आली आहे. यंदा 80 ते 90 हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड अधिक करण्यात आली आहे. एक लाख 53 हजार हेक्टरवर मक्याची पेरणी करण्यात आली आहे. महिनाभरातील पावसाचे प्रमाण चांगले असल्यामुळे आणखी पंधरा दिवस पाऊस झाला नाही तरी पिकांवर फारसा परिणाम होणार नसल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले.

आतापर्यंतचा पाऊस (मि.मी.)

या वर्षी गेल्या वषी
औरंगाबाद 200 102
फुलंब्री 179 100
पैठण 133 80
सिल्लोड 228 120
सोयगाव 279 111
कन्नड 189 109
वैजापूर 151 150
गंगापूर 133 75
खुलताबाद 169 144
सरासरी 185 110