आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राेहिण्या बरसल्या: चार वर्षांनी जूनचा मुहूर्त, वादळी वाऱ्याचाही तडाखा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - अदमासे चार वर्षांनंतर पावसाने यंदा जूनचा मुहूर्त साधला. मराठवाड्यासह राज्याच्या अनेक भागांत रविवारी राेहिणी नक्षत्राच्या जोरदार सरी कोसळल्या. पूर्वमोसमीच असला तरी उन्हाच्या काहिलीने त्रस्त जीवांना या पावसाने दिलासा दिला. औरंगाबाद, जालना, बीड, लातूर जिल्ह्यांत अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. दरम्यान, अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पश्चिम किनाऱ्यावर महाराष्ट्र,गाेवा गुजरातेत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. येत्या २४ तासांत कोकण-गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी, विदर्भात तुरळक पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे.
औरंगाबाद : शहरातवादळी वाऱ्यासह पाऊस झाला. पैठण, वैजापूर, गंगापूर, सिल्लोड, फुलंब्री, खुलताबाद, सोयगाव, कन्नड तालुक्यात हलका ते मध्यम पाऊस झाला. वैजापुरात पत्रे उडाले, झाडे कोसळली.
जालना: शहरपरिसरात अंबडच्या तीर्थपुरी येथे सायंकाळी हलक्या सरी पडल्या. यामुळे रस्त्यावर काही ठिकाणी पाणी साचले.
बीड: गेवराईशहरासह तालुक्यात दुपारी गढी, निपाणी जवळका, शिंदेवाडी, सिरसदेवी, रुई, रांजणी, पाडळसिंगीत पाऊस झाला.

लातूर: शहरातवादळी वाऱ्यासह, तर रेणापूर, उदगीर, औसा तालुक्यांत पावसाने हजेरी लावली.
नाशिक: शहरातशनिवारी काही वेळ, तर रविवारी दुपारनंतर जोरदार पाऊस पडला.

अल निनोचा फटका नाही
स्कायमेटसंस्थेचे सीईओ जतीन सिंह यांच्या मते अल निनोचा भारतावर परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट आहे. यंदा सरासरी म्हणजेच १०० ते १०४ टक्के पावसाच्या अापल्या अंदाजावर स्कायमेट ठाम आहे.

वीज पडून चार ठार
मराठवाड्यात उस्मानाबाद, लातूर, अाैरंगाबाद अाणि नांदेड जिल्ह्यात वीज काेसळून चार जणांचा मृत्यू झाला. मृतांत पिंपळदरीवाडा ता. सिल्लाेड येथील संजय अानंदा अंभाेरे यांचा समावेश अाहे.

वेरूळ परिसरात रविवारी दुपारी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या पावसाने काहींची त्रेधातिरपीट उडाली, तर काहींना मोठा दिलासा दिला. छाया : वैभव किरगत
मान्सून १३ जूनपर्यंत मराठवाड्यात येणार
पुणे - केरळात शनिवारी दाखल झालेल्या मान्सूनची आगेकूच झाली नाही. दोन दिवसांत मध्य अरबी समुद्राचा काही भाग, मध्य कर्नाटक, मध्य तामिळनाडू, रायलसीमा, आंध्र किनारपट्टी बंगाल उपसागराच्या भागात मान्सून दाखल होण्यास स्थिती अनुकूल आहे. मराठवाड्यात १३ जूनपर्यंत मान्सून येईल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. राज्य हवामान सल्लागार डाॅ. रामचंद्र साबळे म्हणाले, राज्यात १३ जूनपर्यंत मान्सूनचा पाऊस येईल. विविध ठिकाणी तो पोहोचेल. पण शेतकऱ्यांनी आताच पेरणीची घाई करू नये. पुढे मान्सूनमध्ये मोठे खंड पडण्याची शक्यता आहे.