आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वनक्षेत्र घटले, मराठवाड्यात यंदाही पर्जन्यमान अनिश्चित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- या वर्षी 7 ते 8 टक्के पाऊस कमी होणार असल्याचा अंदाज हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. मराठवाड्यातील चार जिल्ह्यात पाऊस फार समाधानकारक नसेल असाही अंदाज आहे. यासाठी मराठवाड्यातील घटलेले (सध्या 4.9 टक्के) वनक्षेत्र कारणीभूत असून भूगर्भातील जलपातळी 200 ते 300 फुटांपर्यंत खालावली आहे. पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस भीषण होत चालला आहे. यामुळे वन्यजीव स्थलांतर करत असल्याने त्यांची संख्याही कमी झाली आहे.

मराठवाड्यात निझाम काळापासून वनक्षेत्र केवळ 4.9 टक्के आहे. त्यामुळे परिसरात कमी-अधिक व अनिश्चित पाऊस पडतो. परिणामी पर्यावरणाचा ºहास होत आहे. वनक्षेत्र, नदी, तलाव, धरण, डोंगर हे चांगल्या पर्जन्यमानासाठी अनुकूल घटक आहेत; पण मानवाने या वनसंपदा व नैसर्गिक ठेवा नष्ट करण्याचा सपाटा लावला. नदीतील वाळू उपसा, वृक्षतोड केली जात आहे. त्यामुळे जलपुनर्भरण होत नसल्याने जलपातळीही खालावली. पाणी गळतीद्वारे बाष्प उत्सर्जन अधिक होऊन ढगांची निर्मिती होते; पण जंगल क्षेत्र कमी असल्याने सापेक्ष आर्द्रता निर्माण होत नाही.

चार जिल्हय़ात कमी पावसाची शक्यता
कारखाने व वाहनांची संख्या प्रचंड वाढली. कार्बन डायऑक्साइड वायूचे यातून उत्सर्जन होत असले तरी वृक्ष कमी असल्याने हा वायू कमी प्रमाणात शोषून घेतला जातो. परिणामी यंदा औरंगाबादसह जालना, उस्मानाबाद आणि लातूर या चार जिल्हय़ांत सात ते आठ टक्के पाऊस कमी होईल.

मराठवाड्यात यंदाही पर्जन्यमान अनिश्चित
पर्जन्य घटक कमी असल्याने पाऊस पडण्यासाठी लागणारे वातवरण तयार होत नाही. त्यामुळे त्या भागात अनिश्चित पाऊस पडतो.

झाडांची संख्या कमी : डोंगरावर झाडांची संख्या अत्यल्प आहे. त्यामुळे मान्सून वारे रोखून धरले जात नाहीत. उलट ते वार्‍याच्या दिशेने पुढे सरकतात. त्यामुळे घनदाट वनात जास्त पाऊस पडतो तर पठारी प्रदेशात पर्जन्यमान कमी-जास्त असते. वन क्षेत्र कमी असल्याने त्या भागांत पावसाचे प्रमाणही तुलनेत कमी असते.

पर्जन्य निर्मितीच्या घटकांवर परिणाम
वनक्षेत्र कमी असणे, डोंगरावर उंच वृक्ष नसणे, डोंगर नष्ट करणे, नदीतून अमाप वाळू उपसा यामुळे सापेक्ष आर्द्रता कमी होते. ढगाळ वातावरण तयार होण्यास अडथळा निर्माण होतो. या पर्जन्यनिर्मितीच्या घटकांवर परिणाम होऊन कमी-अधिक पाऊस पडतो.
- प्रा. प्रल्हाद जायभाये, मुख्य समन्वयक, व. ना. म. कृ. विद्यापीठ, हवामान शास्त्र विभाग.

ओसाड जागेवर झाडे लावा
वनक्षेत्रात वाढ करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत; पण शेतकरी, व्यापारी, उद्योजक, नोकरदार या सर्वांनी वृक्ष लागवड, संगोपन व संवर्धनासाठी पुढे यावे. ओसाड जागेत वृक्ष लागवड करावी.
- ए. डी. भोसले, उपवनसंरक्षक अधिकारी. वनविभाग औरंगाबाद.
जिल्ह्यांत कमी पावसाची शक्यता
कारखाने व वाहनांची संख्या प्रचंड वाढली. वृक्ष कमी असल्याने कार्बन डायऑक्साइड कमी प्रमाणात शोषून घेतला जातो. परिणामी यंदा औरंगाबादसह जालना, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यांत सात ते आठ टक्के पाऊस कमी होईल.
- डॉ. रामचंद्र साबळे, हवामान तज्ज्ञ.