औरंगाबाद/पुणे - औरंगाबाद, जालना शहरासह मराठवाड्याच्या काही भागात गुरुवारी मान्सूनने जोरदार हजेरी लावली. औरंगाबादेत सायंकाळच्या सुमारास झालेला पाऊस मान्सूनचा असल्याचा अंदाज वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषी हवामान शास्त्र विभागाचे मुख्य समन्वयक प्रल्हाद जायभाये यांनी व्यक्त केला. दरम्यान, दुपारी नगर जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. तेव्हा मान्सून नगरमध्ये धडकल्याचे पुणे वेधशाळेने स्पष्ट केले होते.
औरंगाबादेतील सातारा, गारखेडा परिसर, बाबा पेट्रोल पंप, मुकुंदवाडी परिसरात जोरदार पाऊस झाला. चिकलठाणा परिसरात पाऊस पडला नाही. त्यामुळे चिकलठाणा वेधशाळेत शहराच्या अर्ध्या भागात झालेल्या पावसाची नोंद नाही. शेतक-यांनी 65 ते 70 मिमी पाऊस झाल्यानंतरच खरिपाची पेरणी केल्यास फायदेशीर ठरेल, असे जायभाये यांनी सांगितले. सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास पैठण रोड ते मुकुंदवाडी परिसरात मान्सूनचा जोरदार पाऊस पडला. यामुळे चाकरमाने, वाहनचालकांचा गोंधळ उडाला. मात्र चिकलठाणा ते पुढील परिसरात पाऊस पडला नाही.
24 तासांत दमदार पाऊस
येत्या 24 तासांत कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. कोकणात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मान्सूनने व्यापलेले जिल्हे
वेधशाळेनुसार सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे, मुंबई, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नागपूर, चंद्रपूर, नाशिक, नगर, जळगाव, सोलापूर, उस्मानाबाद आणि अमरावती हे जिल्हे मान्सूनने आधीच व्यापले आहेत.जालना, औरंगाबादेतही आता तो दाखल झाला आहे.