आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिनाभरानंतर पावसाचे आगमन, तेही तुरळकच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिल्लोड- ११ ते १८ जूनदरम्यान सरासरी १५५ मि.मी. पाऊस पडल्यानंतर दडी मारलेला पाऊस महिनाभरानंतर शुक्रवार, दि. १७ रोजी आल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजेनंतर एक ते दीड तास सरासरी १०० मि.मी. जोरदार पाऊस झाला. शुक्रवारप्रमाणेच शनिवारी दुपारी सिल्लोड शहरात सुमारे १५ मिनिटे तर सायंकाळी अजिंठा परिसरात अर्धा तास पावसाने हजेरी लावली होती. तालुक्यासह पिंपळदरी परिसरात पावसाचा शिडकावा झाल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. आकाशात ढग येत असल्याने लवकरच पावसाला सुरुवात होण्याचे संकेत असल्याने शेतकरी वर्गाची चिंता काही प्रमाणात कमी झाल्याचे दिसून आले. शुक्रवारी अजिंठा, गोळेगाव व निल्लोड या तीन मंडळांत मात्र पाऊस झाला नाही.

महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर झालेला पाऊस सुरू राहिल्यास पिकांचे नुकसानीचे प्रमाण कमी होऊ शकते. गुरुवारी तुरळक, तर शुक्रवारी काही भागांत दिलासादायक पाऊस झाला. अनियमित, अत्यल्प व गारपिटीमुळे मागच्या तीन वर्षांपासून शेतीमालाचे नुकसान होऊन शेतकऱ्यांना अार्थिक फटका बसत आहे. यंदा वेळेवर पाऊस आल्याने मृगात पेरण्या झाल्याने चांगल्या उत्पादनाची व उत्पन्नाची अपेक्षा शेतकऱ्यांना असतानाच पावसाने महिनाभराची आेढ दिली. वाढीला लागलेल्या पिकांची वाढ खुंटून उत्पादनात घट होणार हे निश्चित आहे. पाऊस आल्याने जेवढे हाती लागेल त्यात वर्ष काढता येईल, या आशेवर शेतकरी आहेत, तर यापुढे चांगला पाऊस झाल्यास संरक्षित पाण्यावर रब्बी हंगामाचे पीक घेता येऊ शकते.
१ लाख २१ हजार ४९७ भौगोलिक क्षेत्र असलेल्या तालुक्यात ९८ हजार ७६४ हजार हेक्टर क्षेत्रावर २९ जूनपर्यंत पेरणी करण्यात आली. कापूस व मका या दोन पिकांची माेठ्या प्रमाणात लागवड करण्यात येत असल्याने ३९ हजार ६२५ हेक्टरवर कापूस, तर ४० हजार २६० हेक्टरवर मकाची लागवड आहे. पाण्याअभावी वाढ खुंटल्याने मका बुडखी लागून उत्पन्नात पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक घट होईल. शिवना मंडळातील मादनी, नाटवी या भागात शेतकऱ्यांनी सोयाबीन दहा दिवसांपूर्वीच मोडले, तर अजिंठा मंडळातील पिंपळदरी व अन्य गावांत पाऊस पडूनही उपयोग होणार नसल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीनमध्ये जनावरे घातली.

मंडळनिहाय पाऊस
सिल्लोड २३ मि.मी.
भराडी २८
अंभई १२
आमठाणा १२
बोरगाव बाजार २२
अजिंठा ०
गोळेगाव ०२
निल्लोड ०१ मि.मी.

दुबार पेरणीची वेळ
पावसाअभावी पिके हातातून गेली आहेत. शुक्रवारी सायंकाळी तुरळक का होईना, पण बरसल्याने शेतकऱ्यांच्या दुबार पेरणीसाठी अाशा पल्लवीत झाल्या आहेत. परंतु, अजूनही दमदार पावसाची गरज आहे.

शिवना परिसरात वरुणराजाची कृपावृष्टी
शिवना। सिल्लोड तालुक्यातील शिवन्यासह परिसरात शनिवारी सायंकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. गेल्या महिनाभरापासून दडी मारलेल्या पावसाच्या आगमनाने शेतकरी सुखावले आहेत. पावसाअभावी करपलेल्या पिकांना जीवदान मिळाले असले, तरी अजिंठा डोंगर पायथ्याखालील आमसरी, नाटवी व वाघेरा परिसरातील शेतकऱ्यांना दुबार पेरणीला सामोरे जावे लागणार आहे.
बातम्या आणखी आहेत...