आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • More Effective Measures On The Drought Plan In Marathwada

मराठवाड्यात दुष्काळावरील उपाययाेजना अधिक प्रभावी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मराठवाड्याप्रमाणेचउत्तर प्रदेशाच्या अनेक भागांमध्ये दुष्काळाची दाहकता जाणवत आहे. मराठवाड्यापेक्षा तेथील परिस्थिती भीषण आहे; परंतु दुष्काळाचा सामना करण्यात उत्तर प्रदेश सरकारच्या तुलनेत महाराष्ट्र सरकारने केलेल्या उपाययोजना प्रभावी असल्याचे निरीक्षण अमेरिकेतील अाघाडीचे वृत्तपत्र न्यूयॉर्क टाइम्सच्या पत्रकार निडा नाजार यांनी नोंदवले आहे. विशेषत: चारा छावण्या, गुरांच्या छावण्या आणि टँकरने पाणी पुरवण्याची व्यवस्था शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असल्याचे या पत्रकाराने खास "दिव्य मराठी'शी बोलताना सांगितले.
मराठवाड्यातील दुष्काळाचे वार्तांकन करण्यासाठी निडा नाजार बुधवार ते शुक्रवार आैरंगाबादेत होत्या. त्यांनी मराठवाड्यातील विविध भागांना भेट दिली. गुरुवारी बीड जिल्हा पालथा घातला. दुष्काळविषयक टिपणे घेताना शेतकरी, त्यांचे कुटुंबीय, व्यापारी, प्रशासनातील अधिकारी आणि स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींंशी संवाद साधला. बीड जिल्ह्यातील पालवण येथील राजेंद्र मस्के यांच्या यशवंत बहुद्देशीय सेवाभावी संस्थेची गुरांची छावणी तसेच आष्टी तालुक्यातील खिळद येथील राजू गोल्हार यांच्या संत वामनभाऊ बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या गुरांच्या छावणीला भेट दिली. येथे जनावरांसाठी चारा, पाणी आणि शेतकऱ्यांसाठी जेवणाच्या व्यवस्थेचे निडा यांनी कौतुक केले.

कोण आहे निडा नाजार?
निडामूळ न्यूयॉर्कच्या आहेत. त्यांचे आई-वडील डॉक्टर असून पत्रकारितेची आवड असल्याने निडाने हे क्षेत्र निवडले. इंग्रजी विषय घेऊन बीए केल्यानंतर त्यांनी पत्रकारितेत पदव्युत्तर पदवी घेतली. काही दिवस एनवायटीच्या न्यूयॉर्क कार्यालयात काम केल्यावर २००८ पासून त्या दिल्लीत प्रतिनिधी म्हणून काम बघतात. आरोग्य, पर्यावरण, समाज जीवन, ह्युमन इंटरेस्ट हे त्यांचे आवडीचे विषय आहेत. भारतात येण्यापूर्वी त्यांनी येथील समाजव्यवस्था, इतिहास, जातीव्यवस्था आणि राजकारणाचा अभ्यास केला. महाराष्ट्रात त्यांनी यापूर्वी मुंबई आणि पुण्यात प्रत्येकी एका विषयावरील वार्तांकन केले. मराठवाड्यात त्या प्रथमच आल्या आहेत. मात्र, एनवायटीने यापूर्वी आधार कार्डाची अंमलबजावणी आणि १७० मर्सिडीझ बेंझ कारच्या खरेदीबाबत औरंगाबाद शहराची रिपोर्टिंग केली होती.

महाराष्ट्रातील सुविधा उत्तम
निडायांनी गुरुवारी बीडचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांची भेट घेऊन दुष्काळावर चर्चा केली. दुष्काळाची कारणे आणि त्यावरील उपाययोजनांचा आढावा घेतला. टँकरने पाणीपुरवठा, चारा छावण्या किंवा गुरांच्या छावण्या ही दुष्काळाशी सामना करण्याची तात्पुरती व्यवस्था असून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याकडे शासनाचा भर असल्याचे राम यांनी त्यांना सांगितले. जलयुक्त शिवार योजनेचीही माहिती दिली. "दिव्य मराठी'शी बोलताना निडा म्हणाल्या की, बुंदेलखंडातही दुष्काळाने परिसीमा गाठली आहे. मात्र, तेथील सरकार याबाबत फार गंभीर दिसत नाही. लोकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. त्या तुलनेत महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांची चांगली काळजी घेत असल्याचे त्यांनी सांगितले. विशेषत: छावण्यांमुळे जनावरांची मोठी सुविधा होत असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदवले.
------------------------