आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दररोज शंभरपेक्षा अधिक पासपोर्टचे होते वितरण; जनरल पोस्टमास्तर प्रणव कुमार यांची माहिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- छावणी पोस्ट कार्यालयात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर स्वतंत्र पासपोर्ट केंद्र कार्यान्वित झाले. तेव्हा एकच वेबसाइट असल्याने नागरिकांना अर्ज भरण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र, आता सेवा गतिमान झाल्याने दररोज शंभरपेक्षा अधिक नागरिक पासपोर्टसाठी ऑनलाइन अर्ज भरत आहेत. तसेच पासपोर्टचे वितरणही करण्यात येत असल्याची माहिती पोस्टमास्तर जनरल प्रणव कुमार यांनी “दिव्य मराठी’शी बोलताना दिली. 

पर्यटक, उद्योजक, व्यावसायिकांना कामानिमित्त देश-विदेशात ये-जा करावी लागते. विद्यार्थ्यांना पासपोर्ट मिळत नसल्यामुळे विदेशात जाता येत नाही. ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांभीर्याने घेत औरंगाबाद शहरासाठी पोस्ट कार्यालयात पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार गुढीपाडव्याच्या दिवशी छावणी पोस्ट कार्यालयात पासपोर्ट सेवा कार्यान्वित करण्यात आली. राज्यातील दुसरे तर मराठवाड्यातील पहिले पोस्ट पासपोर्ट सेवा केंद्र सुरू झाल्याने सर्वत्र नागरिकांनी समाधान व्यक्त केले. प्रारंभी दररोज ५० अर्ज स्वीकारले जातील नंतर टप्प्याटप्प्याने विस्तार केला जाईल. दररोज शंभरपेक्षा जास्त नागरिकांना पोस्टातून पासपोर्ट मिळतील, अशी ग्वाही क्षेत्रीय पासपोर्ट अधिकारी डॉ. स्वाती कुलकर्णी यांनी दिली होती. याबाबत पोस्टमास्तर जनरल प्रणव कुमार यांना विचारणा केली असता, त्यापुढे जाऊन आम्ही काम करत आहोत. अर्ज स्वीकारणे पासपोर्ट वितरित करण्याचे काम शंभरावर जाऊन पोहोचल्याचे त्यांनी सांगितले. 

अर्ज करण्याची सोपी पद्धत 
अर्जदारांनीपासपोर्टसाठी passportindia.gov.in या वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज भरावा. त्यानंतर उर्वरित तपासणीसाठी एक विशिष्ट तारीख मिळेल. त्या दिवशी ऑनलाइन अर्ज भरल्याची एक प्रत छावणी कार्यालयात सोबत आणावी. यानंतर कर्मचारी अर्जदाराचे फोटो, बायोमेट्रिक, बोटांचे ठसे घेतील. दररोज शंभरपेक्षा जास्त अर्ज संगणकाद्वारे प्रमाणित करण्यात येत आहेत. कागदपत्रांची पडताळणी करून अर्ज मुंबई प्रादेशिक पासपोर्ट विभागाकडे पाठवण्यात येतात. काही गंभीर त्रुटी असतील, तत्काळ पासपोर्ट हवा असेल, अशांनाच मुंबई कार्यालयातच जावे लागते. इतर सर्व अर्जदारांना पोस्टातून पासपोर्ट मिळत आहे. अर्जाच्या संख्येनुसार कामकाजाची अर्ज स्वीकारण्याची मर्यादा वाढवली जाणार असल्याचे प्रणव कुमार यांनी सांगितले. 

ऑनलाइनमुळे रांगेत उभे राहण्याची कटकट मिटली 
ऑनलाइनअर्ज भरणे अनिवार्य केले आहे. उर्वरित तपासणीसाठी निश्चित तारीख दिली जाते. तेवढेच अर्जदार उपस्थित असतात. त्यामुळे सकाळपासून रांगेत उभे राहण्याची, वेळ संपला तर दुसऱ्या दिवशी पुन्हा पहाटेपासून धावपळ करण्याची कटकट कायमस्वरूपी मिटली आहे. ये-जा करण्याचा खर्चही वाचला आहे. त्यामुळे पासपोर्ट सेवेचे कामकाज अधिक पारदर्शक सोपे झाले आहे. 
बातम्या आणखी आहेत...