आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोनपेक्षा अधिक कंपन्यांना देणार शहर बसचे कंत्राट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - महानगरपालिका खासगी संस्थांच्या माध्यमातून लवकरच शहर बस सुरू करणार आहे. एकाच संस्थेला ही सेवा देण्याऐवजी दोन किंवा त्यापेक्षा इच्छुक कंपनीकडून विविध भागात सेवा देण्यात येईल, असा निर्णय गुरुवारी पार पडलेल्या शहर बस वाहतूक समितीच्या बैठकीत घेण्यात आला. हा विषय प्राधान्यक्रमाने घेण्यात आला असून एक ते दोन महिन्यांत सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.

सर्व विभागीय शहरे मुंबई, पुणे, नवी मुंबई, नाशिक, नागपूर, अमरावती या ठिकाणी सक्षम शहर बस वाहतूक व्यवस्था आहे. औरंगाबाद मात्र याला अपवाद आहे. मनपाची आर्थिक परिस्थिती बिकट असून मागील अनुभवातून धडा घेत समितीने नवीन शिफारशी सुचवल्या आहेत. सूचनांपूर्वी अतिरिक्त आयुक्त रमेश पवार यांनी आपण उत्तम अशी सेवा देऊ शकतो का? असा प्रश्न उपस्थित केला. बससेवा यशस्वी करायची असल्यास पूर्वीच्या करारातील अटीशर्तींचा अभ्यास करून त्यात बदल करण्याची शिफारसही सर्वानुमते करण्यात आली. या वेळी स्थायी समिती सभापती दिलीप थोरात, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी तथा शहर बस वाहतूक समितीचे सदस्य श्याम लोदी, विधी सल्लागार अपर्णा थेटे, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, उपअभियंता यू. जी. शिरसाट, कनिष्ठ अभियंता अमोल कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.

या बाबींवर विशेष भर
अगोदरविद्यार्थी आणि ज्येष्ठांना प्रवासभाड्यात सवलत मनपा देणार होती. मात्र हा भार जास्तीचा असल्याने सवलत संस्थेनेच द्यावी, असा ठराव घेऊन सवलतीची रक्कम संस्थेने भरावी. त्या बदल्यात बसवरील जाहिरातीची रॉयल्टी माफ करण्यात येणार आहे. मनपाला संस्थेच्या गाड्या पार्किंग वर्कशॉपसाठी जागा उपलब्ध करून द्यावी लागणार आहे. बस थांबे संस्थेनेच दुरुस्ती करायची आहेत. त्यावर लागणाऱ्या जाहिरातींची रॉयल्टी मनपाकडे जमा करावी लागेल.

नफ्याऐवजी सेवा महत्त्वाची
महानगरपालिकेला नफा मिळावा, यासाठी ही सेवा सुरू करण्यात येत नसून नागरिकांना दिलासा मिळावा या दृष्टीने पाऊल उलचण्यात येणार आहे. बससेवा लवकर सुरू करण्याचा प्रयत्न असणार आहे. - दिलीप थोरात, स्थायीसमिती सभापती, महानगरपालिका, औरंगाबाद

भाजप नेत्याचे नातेवाइक करताहेत मोर्चेबांधणी
शहरबससेवेचे कंत्राट घेण्याची भाजप नेत्याच्या एका नातेवाइकाने तयारी सुरू केली आहे. त्यापूर्वी त्याने पुण्यातील औद्योगिक वसाहतीत बससेवा चालवणाऱ्या एका ठेकेदाराशी संपर्क साधला आहे. विद्यमान सभापतींच्या कार्यकाळातच कंत्राट मंजूर करून घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

अभ्यास समिती घेणार निर्णय : मनपा प्रतिनिधी भाेपाळ, नाशिक, पुणे येथे जाऊन तेथील बससेवेचा सखोल अभ्यास करणार आहेत. त्यानंतर समितीच्या शिफारशींचा अभ्यास करून शहर बससेवा कशी सुरू करता येईल, यावर अभ्यास समिती अहवाल देणार आहे.

जुन्यातून शिकत नव्या शिफारशी
बसखरेदी खासगी संस्थेलाच करावी लागणार असून दरमहा प्रतिबस रॉयल्टी भरावी लागेल. मनपाचे वाहतुकीवर नियंत्रण असेल. एकाच संस्थेऐवजी अनेकांना बससेवेची संधी मिळेल. जाहिरातीचे कर घेता येणार नाही. मनपाच्या जाहिरातींसाठी बसच्या आतील, मागील बाजूस जागा राखीव राहील. निविदेचा कालावधी जोपर्यंत आहे तोपर्यंतची हमी नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटच्या स्वरूपात खासगी संस्थेला जमा करावी लागेल.