आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारणातील शिस्तीचा आदर्श वस्तुपाठ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजकीय कारकीर्द आणि समाजिक सलोखा जोपासणारे मोरेश्वर सावे शिस्तीचे भोक्ते हाेते आणि प्रसंगी कठोरही वागायचे...

रंगाबादेतील शिवसेनेचे पहिले महापौर, पहिले खासदार अशी ओळख असलेले मोरेश्वर सावे हे त्यांच्या शिस्तीसाठी प्रसिद्ध होते. ते महापौर असताना त्यांनी सर्वसाधारण सभेत गोंधळ होऊ दिला नाही. कारण एक दिवस आधीच सदस्यांच्या प्रश्नांची ते यादी घेत. त्यांच्याकडे नोंदणी केलेल्या सदस्यांशिवाय कोणालाही सभागृहात बोलण्याची परवानगी नव्हती. अवांतर विषयावर बोलण्यासही मनाई होती. इतकेच काय, महापौरांच्या दालनात कोणीही केव्हाही यायचे नाही, असाही दंडक त्यांनी घालून दिला होता. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी महापौरांचे दालन उघडे असले तरी काम असेल तरच या, असा थेट कायदाच त्यांच्या काळात होता. राजकारणात शिस्तीत जगता येते, असे त्यांनी दाखवून दिले होते. ते स्वत: शिस्तीत वागत असल्याने त्यांच्या आदेशापुढे जाण्याची कोणाची हिंमत नव्हती. त्यांच्यानंतर शिस्तीचा भोक्ता असा महापौर शहराला लाभला नाही.
लातूर नगर परिषदेत नगरसेवक म्हणून काम केलेले सावे हे व्यवसायाच्या निमित्ताने औरंगाबादेत दाखल झाले. १९८८ च्या निवडणुकीत त्यांनी समर्थनगर वाॅर्डातून अपक्ष म्हणून विजय मिळवला अन् नंतर ते शिवसेनेत दाखल झाले. महापौरपदाच्या पहिल्या निवडणुकीत राजकीय आखाड्यात शिवसेना कमी पडली. त्यामुळे शहराचे पहिले महापौर होण्याची त्यांची संधी हुकली असली तरी त्याची कसर त्यांनी पुढील वर्षी भरून काढली. त्यांचा अभ्यास, शिस्त, कामाप्रति निष्ठा या गोष्टी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भावल्याने शिवसेनेचे पहिल्या महापौरपदाच्या उमेदवारीसाठी त्यांना फार कष्ट करावे लागले नाहीत. १९८९ ला ते शहराचे दुसरे तर शिवसेनेचे पहिलेच महापौर झाले.
तेव्हा महापौरपदाचा कालावधी एक वर्षाचा होता. त्यांना या पदावर फारसा वेळ मिळाला नसला तरी या काळात त्यांनी पालिका प्रशासन, नगरसेवक यांना एक शिस्त लावली होती. आज सर्वसाधारण सभेत कोणीही उठतो अन् काहीही बोलतो. कोण काय बोलते हे पीठासीन अधिकारी म्हणजेच महापौरांनाही ऐकू जात नाही. तेव्हाच्या सभागृहात मुस्लिम लीग हा पक्ष होता अन् कडवटपणा जास्त होता. तेव्हा त्यांनी नगरसेवकांना शिस्तीचे धडे दिले. विशेष म्हणजे सर्व सदस्यांनी ते स्वीकारले होते. आजही मनपात शिस्तीसाठी त्यांचेच उदाहरण दिले जाते.
पुढे ते शिवसेनेचे पहिले खासदार झाले. ‘पेटती म्हशाल’ या चिन्हावर ते विजयी झाले होते. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्याशी बिनसल्यानंतर त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. शब्दांकन: दत्ता सांगळे
राजकारण आणि समाजकारणातून वेळ काढून आपल्या कुटुंबासोबत रमणारे मोरेश्वर सावे.
बातम्या आणखी आहेत...