आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘शहिदों के आरमानों को मंजील तक पहुचायेंगे... आगे जायेंगे’, पानसरेंच्या स्मृतीनिमित्त ‘मॉर्निंग वॉक’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विविध संघटनांच्या वतीने विद्यापीठ ते भडकल गेटदरम्यान मॉर्निंग वॉक काढण्यात आला. छाया : माजिद खान - Divya Marathi
विविध संघटनांच्या वतीने विद्यापीठ ते भडकल गेटदरम्यान मॉर्निंग वॉक काढण्यात आला. छाया : माजिद खान
औरंगाबाद- ‘शहिदोंके आरमानों को मंजील तक पहुचायेंगे...लाठी गोली खायेंगे, फिर भी आगे जायेंगे’ या क्रांतिकारी घोषणांनी सोमवारची (२० फेब्रुवारी) सकाळ उजाडली. ‘शिवाजी कोण होता?’ या ग्रंथाचे लेखक तथा ज्येष्ठ कम्युनिस्ट विचारवंत अॅड. गोविंद पानसरे यांचा मॉर्निंग वॉकदरम्यान झालेल्या खुनाच्या घटनेला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. सनातन संस्थेवर बंदीसाठी हे प्रतीकात्मक आंदोलन करण्यात आले. 

‘कल भी वे हारे थे, आज भी वे हारेंगे...कल भी हम जिते थे आज भी हम जितेंगे’, अन् ‘कलबुर्गी, दाभोलकर, पानसरे अमर रहे...अमर रहे’ आदी घोषणा देत सोमवारी सकाळी सात वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ‘वाय पॉइंट’ येथील बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून ‘मॉर्निंग वॉक’ला सुरुवात झाली. भाकप, माकप, लाल निशाण पक्ष, एसएफआय, एआयएसएफ, डीवायएफआय, रिपब्लिकन पार्टीसह विविध पुरोगामी, परिवर्तनवादी, लोकशाही विचारसरणीचे प्रमुख नेते, कार्यकर्त्यांसह हा प्रतीकात्मक ‘वॉक’ निघाला. विद्यापीठ गेटसमोरील बाबासाहेबांचा पुतळा, पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालय, पाणचक्की, घाटीमार्गे भडकल गेट येथील बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर सकाळी वाजता समारोप करण्यात आला. 

भाकपचे ज्येष्ठ नेते डॉ. भालचंद्र कांगो यांनी सर्वांच्या वतीने प्रातिनिधिक भाषण केले. ‘आम्ही सारे...पानसरे’, ‘जितेंगे..लडेंगे’ लिहिलेले टी शर्ट परिधान करून मोठ्या संख्येने विद्यार्थी -विद्यार्थिनींनी ‘मॉर्निंग वॉक’मध्ये सहभाग घेतला. भाकप नेते अॅड. मनोहर टाकसाळ, जिल्हा सचिव प्रा. राम बाहेती, निसर्ग मित्रमंडळाचे प्रा. विजय दिवाण, लाल निशाण पक्षाचे भीमराव बनसोड, फुले-शाहू-आंबेडकर विचार प्रबोधन परिषदेचे अॅड. रमेशभाई खंडागळे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गौतम लांडगे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रबोधनकार शहाजी भोसले, डॉ. रश्मी बोरीकर, सोनालिका नागभिडे, अॅड. संघपाल भारसाखळे, अॅड. अभय टाकसाळ, प्रा. भारत शिरसाट, बुद्धप्रिय कबीर, मेजर सुखदेव बन, अॅड. जनार्दन भोवते, डॉ. उमाकांत राठोड, भास्कर लहाने, क्षमा खोब्रागडे, मधुकर खिल्लारे, वसुधा कल्याणकर, एसएफआयचे सुनील राठोड, नितीन वाव्हळे, सत्यजित म्हस्के, प्राजक्ता शेटे आदींसह शेकडो विवेकवादी कार्यकर्त्यांनी ‘मॉर्निंग वॉक’मध्ये सहभाग नोंदवला. 

प्रधानमंत्री, मुख्यमंत्र्यांना पाठवले निवेदन 
जिल्हाधिकारीनिधी पांडे यांच्यामार्फत सर्वांच्या स्वाक्षरीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवण्यात आले. २०११ दरम्यान तत्कालीन सरकारने सनातन संस्थेवर बंदी आणण्यासाठी प्रक्रिया सुरू केली होती. मात्र पुढे काहीच हालचाल केली नाही. त्यामुळे राज्य सरकारने केंद्राकडे पाठपुरावा करून संस्थेवर बंदी आणावी, हल्लेखोरांना पकडावे. रुद्र पाटील, विनय पवार, सारंग अकोलकर, प्रवीण निंबकर आणि जयप्रकाश हेगडे आदींचे फोटो एनआयएच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करून त्यांना अटक करावी, हल्लेखोरांचे रेखाचित्र सर्व पोलिस ठाण्यांत प्रसिद्ध करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. 
बातम्या आणखी आहेत...