आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवाळी अंकांच्या खिडकीतून डोकावतेय राजकारण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- दिवाळीत खमंग फराळाबरोबर खुसखुशीत दिवाळी अंकांचे वाचन नागरिकांना आनंद देणारे ठरते. त्यामुळेच गॅस सबसिडी, मतसुरक्षा विधेयक, दोषी लोकप्रतिनिधींना सुरक्षा आदी विषयांपासून ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या आणि अन्नसुरक्षा विधेयक, अशा अनेक विषयांची छाप यंदाच्या दिवाळी अंकांवर दिसून येत आहे. त्यामुळे नेहमीच विविध चर्चांनी गाजणारा राजकीय पटल दिवाळी अंकांतूनही प्रत्येक घरात डोकावत आहे.

दिवाळीचा फराळ, फटाके, मिठाई यासोबत दिवाळी अंक वाचकांसाठी पर्वणीच आहेत. पूर्वी दिवाळी अंकांत मनोरंजनासमवेतच परंपरा, संस्कृतीची माहिती असायची. त्यामुळे साहित्यप्रेमी दिवाळी अंक भेट म्हणून देतात. वाचकांच्या आवडी-निवडीनुसारच दिवाळी अंकांमध्ये विविध विषय हाताळले जातात. आता तर विशेष वर्गानुसार विशेषांक प्रकाशित होत आहेत. आज जवळपास 800 दिवाळी अंक प्रकाशित होतात. साहित्य संस्कृती जपण्याबरोबरच चालू घटना आणि घडामोडींवर विडंबन करून हास्याचे फवारे उडवणारे दिवाळी अंक साहित्यप्रेमींच्या पसंतीस उतरत आहेत. यंदाच्या दिवाळी अंकात लालूप्रसाद यादव यांच्या चारा घोटाळ्यावरही विनोदी लिखाण दिसून येते. एका अंकात ‘म्हशी सांभाळता सांभाळता चार्‍यातही घोटाळ केला, तुम्ही जातीवादी आहात, दंगलखोर आहात, पण माझे अत्यंत जवळचे मित्र आहात, आपली मैत्री राजकारणापलीकडे आहे,’ अशा ओळी आहेत. विविध वाहिन्यांवरील सासू-सुनेच्या मालिका बघण्यासाठी घराघरांत होणारे रिमोट कंट्रोलसाठीचे भांडण दाखवताना ‘आई म्हणते, मला सासू हवी, तर मुलगा म्हणतो, मला आजोबा हवेत.’ तसेच आसाराम बापूंच्या लीलांवर ‘तन मन आणि धन मी भक्तांकडून लुटलं,’ असा संवाद असलेले, हसून लोटपोट करणारे विषय या दिवाळी अंकांत आहेत. वैचारिक साहित्य प्रेमींसाठी राजकीय आणि सामाजिक, तर चटपटीत विनोदातून समाजातील अपप्रवृत्तींवर कोरडे ओढण्याची परंपरा या अंकांनी कायम राखली आहे. बहुचर्चित चारा घोटाळ्यासह आसाराम बापू आणि अखिलेश यादव दंगलप्रकरणावरील लेखांनी यंदाचे दिवाळी अंक सजले आहेत. बहुतेक दिवाळी अंक शहरात दाखल झाले आहेत.

दिवाळी अंकांचे प्रकार
विनोदी दिवाळी अंक : विनोदी दिवाळी अंकांत आवाज, ऑल दी बेस्ट, आक्रोश, दिवाळी आवाज, धमाल धमाका, फिरकी, हास्यरंग, हा हा हा, हास्यांगण, जत्रा, हसवंती, कॉमेडी कट्टा आदी.
साहित्यविषयक अंक : अनुभव, आश्लेषा, दीपमाला, दीपावली, हंस, अंतर्नाद, अमृत घट, अपूर्वाई, आनंदघन, चंद्रकांत, एकता, आकंठ, अधिष्ठान, अक्षर.
महिलांसाठी अंक : अनुराधा, अलका, गृहशोभा, गृहशोभिका, मानिनी, मिळून सार्‍याजणी, मैत्रीण, सासर- माहेर, वसुधा.

भेट म्हणून द्या दिवाळी अंक
साहित्य संस्कृतीचे जतन आणि एक आगळीवेगळी भेट म्हणून दिवाळी अंक दिवाळीत भेट देण्याची परंपरा आहे. यंदा दिवाळी अंकांच्या किमतीत चार ते पाच टक्क्यांनी वाढ झाली आहे. असे असले तरी दिवाळी अंक घेणार्‍यांची संख्या कमी नाही. आरोग्यविषयक व विनोदी दिवाळी अंक घेण्याला वाचक पसंती देतात. - शरद शहा, औरंगाबाद बुक डेपो.