आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाळूज येथे कंटेनरच्या धडकेत माय-लेकीचा अंत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळूज- कारखान्यात मजुरीसाठी जाणारी महिला व तिच्या पाचवर्षीय मुलीला भरधाव कंटेनरने चिरडले. यात महिलेचा घटनास्थळी तर मुलीचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला. हृदय पिळवटून टाकणारी ही घटना रविवारी सकाळी पावणेनऊच्या सुमारास कामगार चौकाजवळ घडली. द्वारकाबाई यादवराव चोपडे (40) आणि कल्याणी यादवराव चोपडे (5, रा. कदम हाऊसिंग सोसायटी, पंढरपूर) अशी मृत मायलेकीची नावे आहेत. अपघातानंतर जमावाने कंटेनरचालकाला चांगलाच चोप दिला. पंढरपूरलगत राहणार्‍या द्वारकाबाई चोपडे वाळूज एमआयडीसीतील एका कारखान्यात मजुरीचे काम करतात. रविवारी सकाळी त्या मुलगी कल्याणीसह कारखान्यात कामावर जाण्यासाठी निघाल्या होत्या. कामगार चौकालगतच्या उज्ज्वल डायनिंग हॉलसमोरील चौकात मागून आलेल्या भरधाव कंटेनरने (एमएच 16एई 3659) या मायलेकीला चिरडले. यात द्वारकाबाई कंटेनरच्या पाठीमागील चाकात सापडल्याने जागीच ठार झाल्या, तर कल्याणी जोरदार धडकेमुळे दूरवर फेकली गेली. ती गंभीर जखमी झाली. पोलिसांनी तिला बेशुद्धावस्थेत घाटी रुग्णालयात हलविले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला.

चालकाला जमावाने बदडले : अपघातानंतर जमावाने कंटेनरचालक पोपट प्रल्हाद खेडकर (37, रा.शिऊर भालगाव, ता.पाथर्डी, जि.नगर) याला चोप दिला. जमावाच्या मारहाणीत जबर मार लागल्याने त्याचे तोंड सुजले होते. वाळूज एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्यास अटक केली आहे. पोलिस उपनिरीक्षक सुरेश खाडे पुढील तपास करीत आहेत.