आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोयगाव तालुक्यात नवजात मुलीला मातेनेच जिवंत गाडले, मातृत्वाला काळिमा फासणारी घटना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोयगाव - तालुक्यातील शिंदोळ गावातील एका महिलेने अनैतिक संबंधातून जन्मलेल्या मुलीस शेतात जिवंत गाडल्याचा खळबळजनक व मातृत्वाला काळिमा फासणारा प्रकार उघडकीस आला. सोयगाव पोलिसांनी त्या निर्दयी मातेस अटक केली असून न्यायालयाने तिला पाच दिवसांची कोठडी सुनावली आहे.
सोयगाव तालुक्यातील शिंदोळ गावातील अरुणाबाई राजू सोनवणे (33) हिला तिच्या पतीने आठ वर्षांपासून सोडले आहे. त्यामुळे अरुणा सोनवणे ही माहेरी राहत होती. तिथे तिचे एका युवकाबरोबर अनैतिक संबंध प्रस्थापित झाले व यातूनच तिला दिवस गेल्याने ती गरोदर राहिली. अशा स्थितीत तिच्या माहेरच्या मंडळींनी तिला तिच्या सासरी शिंदोळ येथे आणून सोडले. यानंतर 29 जानेवारी रोजी अरुणाने एका गोंडस मुलीस जन्म दिला, परंतु मुलीमुळे आपली समाजात बदनामी होईल, या भीतीपोटी तिने अत्यंत निर्दयीपणे आपल्या पोटच्या मुलीला एका शेतात नेऊन जिवंत गाडले, परंतु एका शेतकर्‍याला त्या मृत मुलीचा पाय खड्डय़ामधून बाहेर आल्याचे दिसल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. त्या शेतकर्‍याने याची माहिती सोयगाव पोलिसांना कळवली. त्यानंतर पोलिस निरीक्षक संतोष घाटेकर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आणि तपासाची चक्रे फिरवली. 1 फेब्रुवारी रोजी अरुणा सोनवणे हिला सोयगाव पोलिसांनी अटक केली.
अरुणा सोनवणे हिला अटक केल्यनंतर तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या तपासणीत पुरण्यात आलेले अर्भक हे तिचेच असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर मीच या मुलीची आई असून माझे पाप लपवण्यासाठी मीच तिला जिवंत पुरले असल्याची कबुली अरुणाने पोलिसांना दिली. सोयगाव पोलिसांनी तिला अटक करून सोयगाव न्यायालयासमोर हजर केले असता तिला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
या प्रकरणी जिल्हा पोलिस अधीक्षक ईशू सिंधू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संतोष घाटेकर, फौजदार बळवंत जमादार, पोलिस कॉन्स्टेबल संजय मदने, एस. एस. मोरे, काशिनाथ चौधरी अधिक तपास करत आहेत.