औरंगाबाद - बीएस्सी अॅग्री झालेला तरुण नोकरीसाठी इंटरव्ह्यू द्यायला म्हणून अकोल्याला गेला. निवडही झाली, पण परतताना क्रूर नियतीने घाला घातला आणि भीषण अपघात होऊन ब्रेनडेड झाला. बुलडाण्याच्या मेहकर तालुक्यातील देऊळगाव महीच्या २४ वर्षीय रामची ही दुर्दैवी कहाणी. दु:खाचा डोंगर कोसळलेल्या स्थितीतही रामच्या आई मंदाबाई यांनी मन घट्ट करून त्याच्या अवयवदानाचा निर्णय घेतला. सिग्मा रुग्णालयात शुक्रवारी पहाटे शस्त्रक्रिया करून रामचे अवयव काढले जातील आणि तत्काळ विमानाने मुंबई व चेन्नईला पाठवले जातील. त्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
पती सुधाकर यांच्या निधनानंतर मंदाबाई यांनी दोन मुले व दोन मुलींचा २० वर्षांपासून सांभाळ केला. थोरला श्याम बारावीनंतर घरची १८ एकर शेती करू लागला. धाकटा राम बुलडाण्याच्या काॅलेजातून कृषी पदवीधर झाला. अकोल्याहून परतणाऱ्या रामची दुचाकी मेहकर-माालेगाव रस्त्यावरील गतिराेधकावर अादळली. यात त्याच्या मेंदूला जबर मार लागला. योगायोगाने रामचे चुलतभाऊ मागाहून येत होते. रामला आधी मेहकर येथे व नंतर औरंगाबादच्या एमआयटी रुग्णालयात दाखल केले. तेथेच बुधवारी त्याला ब्रेनडेड घोषित करण्यात आले. रामचे काका सुभाष राजाराम मगर, मामा सिद्धेश्वर गाडगे यांनी त्याच्या अवयवदानाचा विचार मांडला. मंदाबाई यांनी कोणाला जीवदान मिळणार असेल तर हरकत नाही असा निर्णय १५ मिनिटांत दिला. मग रामला सिग्मा रुग्णालयात हलवण्यात आले.
कुणाला काय मिळणार
जसलोक रुग्णालय, मुंबई : किडनी
धूत रुग्णालय औरंगाबाद : किडनी
ग्लोबल रुग्णालय मुंबई : लिव्हर
चेन्नई : हृदय
(ग्लोबल रुग्णालय, मुंबई येथे दाखल नाशिकच्या महिलेला लिव्हर दिले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अन्य अवयव नेमके कुणाला देणार याचा तपशील सांगण्यास डॉक्टरांनी नकार दिला.)
पुढे वाचा... अँब्युलन्स थेट विमानाजवळ