आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Mother Tongue In Trouble, Linguist Dr.Ganesh Devi Express Unhappiness

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

साठ वर्षांत मातृभाषांचे खच्चीकरण, भाषाशास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. गणेश देवी यांची खंत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - गेल्या साठ वर्षांत साहित्यात अनेक प्रवाह स्थिर होताना दिसतात. यातील १९६१ ते २०११ या काळात जी जनगणना झाली त्यात सुरुवातीला १ हजार ६५२ मातृभाषांचा उल्लेख होता; परंतु २००१ ते २०११ मध्ये केवळ १२२ भाषांचीच नावे दिसतात. हा चिंतेचा विषय असून ७० वर्षांचा भाषेचा इतिहास असताना साठ वर्षांत १५०० भाषांचे खच्चीकरण झाल्याची खंत वाटते, असे परखड मत, भाषाशास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. गणेश देवी यांनी रविवारी व्यक्त केले.

एमजीएम संस्थेच्या रुक्मिणी सभागृहात ज्येष्ठ साहित्यिक आणि समीक्षक डॉ. प्रल्हाद लुलेकर लिखित "साठोत्तरी साहित्य' भाग एक आणि दोनचे प्रकाशन डॉ. देवी यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी डॉ. सूर्यनारायण रणसुभे, तर डॉ.रामचंद्र काळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. देवी म्हणाले, २ लाख ३० हजार वर्षांपूर्वी बोलीभाषेपूर्वी मातृभाषा ही चिन्हे, ताल, हुंकार व संगीताची होती. हळूहळू त्यात बदल होऊन शाब्दिक भाषा तयार झाली आहे; परंतु ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा आपल्याकडे असतानाही मातृभाषा मरण पावत आहे. या भाषा वाचवण्याचे आणि त्यांचे जतन करण्याचे आव्हान आपल्या समोर आहे. साहित्य
अस्मितेचे सम्यक दर्शन डॉ. लुलेकरांच्या ग्रंथात आहे. त्यांच्या लेखनात प्रामुख्याने फुले, शाहू आणि आंबेडकर हे तीन मानबिंदू आहेत. जे त्यांना सामाजिक घटनांकडे परखडपणे पाहण्यास मदत करतात.

लेखना मागची भूमिका स्पष्ट करताना डॉ. लुलेकर म्हणाले, मराठवाड्यातील लेखकांचा प्रभाव लेखनात असून, एक भूमिका घेऊन मी लेखनाला सुरुवात केली आहे. परंतु मराठी विषयात विद्यार्थ्यांना भाषा शिकवण्याऐवजी केवळ साहित्य शिकवले जात आहे. यात काहीअंशी प्राध्यापकही जबाबदार आहेत. आपल्याकडे मोठ्या प्रमाणात साहित्य आहे. परंतु इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सांस्कृतिक अभिसरण झाले नाही, यांची खंतही वाटते.
या प्रसंगी डॉ.रामचंद्र काळुंखे यांनी दोन्ही ग्रंथावर भाष्य केले. अध्यक्षीय समारोप डॉ.सूर्यनारायण रणसुभे यांनी केला. डॉ.समाधान इंगळे यांनी सूत्रसंचालन केले.