आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावधान! शालेय पोषण आहारात उंदीर, पालीची विष्ठा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - बिहारमध्ये शालेय पोषण आहारातून विषबाधा झाल्यामुळे विद्यार्थी मृत्युमुखी पडल्याची घटना ताजी असतानाच मुकुंदवाडी परिसरातील अंगणवाडीत दिल्या जाणार्‍या (शिजवून ) पोषण आहारात उंदीर आणि पालीची विष्ठा आढळली. पालक आणि शिक्षकांच्या सतर्कतेमुळे संभाव्य धोका टळला असला तरी जनावरेही तोंड लावणार नाहीत असे विषारी अन्न चिमुकल्यांच्या माथी मारले जात आहे.

संतोषीमातानगर येथील अंगणवाडी क्रमांक 6 आणि 7 मध्ये एकूण 75 विद्यार्थी शिकतात. जिल्हा एकात्मिक बाल विकास प्रकल्पांतर्गत या अंगणवाड्या सुरू आहेत. आशादेवी समाजसेवा ट्रस्टकडून गेल्या पाच वर्षांपासून या भागातील चार अंगणवाड्यांना पोषण आहार पुरवला जातो. सोमवारी (22 जुलै) अंगणवाडी क्र. 6 च्या शेजारी राहणारा करीम शेख (10) या मुलाने अंगणवाडीतून खिचडी आणली. मित्रांसोबत बसून ती खात असताना अचानक त्याला मळमळ होऊ लागली. बेचव आणि अर्धकच्चे अन्न खावेसे वाटत नसल्याने त्याने खिचडी बारकाईने निरखून पाहिली, तर त्यात उंदीर आणि पालीची विष्ठा आढळली. हा प्रकार पाहून त्याला धक्काच बसला. मागील अनेक दिवसांपासून निकृष्ट दर्जाचा पोषण आहार दिला जात असल्याचा आरोप अंगणवाडी सेविका करत आहेत. याबाबत अनेक वेळा प्रकल्प अधिकार्‍यांकडे तक्रार केली तरी कारवाई केली जात नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधीने अंगणवाडीत जाऊन आहाराची पाहणी केली असता त्यात केस, पोत्यांचे दोर, साळी, लेंड्या आढळून आल्या. दरम्यान, हे वृत्त प्रकाशित होऊ नये म्हणून विद्यापीठातील एका अधिसभा सदस्याने भरपूर प्रयत्न केले.


तक्रारीचा फायदा नाही
खिचडीत नेहमी केस, उंदीर, पालीच्या लेंड्या आढळून येतात. पोह्यांचा असहय़ वास येतो. तीन वर्षांपासून आम्ही अधिकार्‍यांकडे तक्रार करत आहोत, परंतु तरीही कारवाई झालेली नाही. सरला लोखंडे, अंगणवाडी सेविका, क्रमांक-7.


अन्न फेकून देतो
मुलांना आहार देण्याआधी आम्ही ते तपासतो. चिवडा म्हणून पांढरे मुरमुरे असतात. अर्धवट शिजवलेल्या तांदळाची तक्रारही केली. वारंवार अन्न फेकूनही दिले. मात्र, त्याची दखल घ्यायचे सोडून आम्हालाच चार गोष्टी सुनावण्यात आल्या. चंद्रकला सरोदे, अंगणवाडी सेविका.


वारनिहाय आहाराचे स्वरूप असे
सोमवार, मंगळवार खिचडी
बुधवार, शनिवार उसळ
शुक्रवार गोड पदार्थ
323 अंगणवाड्या शहरात चालतात
28 लाख पोषण आहारावर होणारा खर्च
03 प्रकल्पांतर्गत चालतात अंगणवाड्या
चिवड्याच्या नावाखाली नुसतेच मुरमुरे दिले जातात.


मुलांच्या जिवाशी खेळ
माझा मुलगा अंगणवाडीत शिकायला जातो. आज मुलाने डबा घरी आणला. तो उघडून पाहिला असता त्यात उंदराची विष्ठा आढळली. मुलांच्या जिवाशी खेळ केला जात आहे. हिराबाई गायकवाड, पालक.


पुरेपूर काळजी घेण्यात येते
अन्न शिजवताना पुरेपूर काळजी घेतली जाते. आदल्या दिवशीच सर्व पदार्थ निवडून ठेवले जातात. एखादेवेळी थोडेफार तिखट-मीठ-तेल कमी झाले असेल. त्यामुळे एकदा तक्रार आली होती. पण काहीही असले तरी कामात कुचराई केली जात नाही. एस. एम. सानप, आशादेवी सेवा ट्रस्ट.


दोषींवर कारवाई करू
माझ्याकडे अद्याप कोणतीही तक्रार आली नाही. यापूर्वी तक्रार केली असल्यास याबाबत माहिती नाही. याप्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल. मिलिंद वाघमारे, बालविकास प्रकल्प अधिकारी.