आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिसण्याकडे दुर्लक्ष करताच महाराष्ट्राने मला आपलेसे केले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - माझ्या दिसण्याबाबत माझ्यात खूप न्यूनगंड होता. माझे केस, माझे दात मला मुळीच आवडत नव्हते. पण ज्या क्षणी मी माझ्या दिसण्याकडे दुर्लक्ष केले त्या वेळी संपूर्ण महाराष्ट्राने मला आपलेसे केले. स्वत:ला प्रभावित केले की जग आपोआपच प्रभावित होते, असे सांगत लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ जाधव याने आपल्या यशाचे रहस्य उलगडले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या विभागीय केंद्राच्या वतीने शुक्रवारी आयोजित चित्रपट चावडी कार्यक्रमात असहिष्णुतेच्या मुद्द्यावर भाष्य करणाऱ्या २२ मिनिटांच्या ‘आझाद’ लघुपटाच्या प्रदर्शनानंतर तो बोलत होता. या वेळी ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे, वृत्तपत्रविद्या महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रेखा शेळके आणि नवमहाराष्ट्र युवा अभियानचे अध्यक्ष नीलेश राऊत, निशा ग्रुपचे प्रतीक परसवाणी यांची उपस्थिती होती.

सिद्धार्थ म्हणाला, सर्वसामान्य जीवनात चर्चिला जाणारा विषय या लघुपटाच्या निमित्ताने मांडण्यात आला आहे. उच्च शिक्षण, विकासाच्या वाटेवर आजही आपण जाती-धर्माच्या भिंतींमध्ये कैद आहोत. आझाद होण्याचा विचार मांडणारा हा लघुपट होता. मी कॉलेजमध्ये असताना रा. रं. बोराडे यांची ‘पाचोळा’ कादंबरी वाचली होती. मला तो चित्रपट वाटतो. आज ती कथा लिहिणाऱ्या महान व्यक्तीसोबत बसण्याची संधी मिळाली हे भाग्य आहे.

या वेळी सिद्धार्थने तरुणांना व्यसनांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. दुसरा काय करतोय यापेक्षा आपण काय करायचे यावर लक्ष केंद्रित करा, असेही तो म्हणाला. आपल्या अनोख्या शैलीने त्याने क्षणातच सर्वांना आपलेसे केले. २० मिनिटांच्या भाषणात सिद्धार्थने सर्वांना खळखळून हसवले.

यांची होती उपस्थिती
असहिष्णुतेवर भाष्य करणाऱ्या ‘आझाद’ चित्रपटाचा दिग्दर्शक किशोर लोंढे यानेही लघुपटाचा प्रवास मांडला. या वेळी संवादलेखक मैनुद्दीन जमादार, कलावंत राहुल पुणे, प्रदीप पवार, अक्षय चेके, संगीत संयोजक रंगराज बोंबले, एडिटर सागर जैन, प्रशांत सपकाळ, प्रणव जाधव, वैभव वैद्य आणि अक्षय तांगडे यांचीही उपस्थिती होती. श्रीकांत देशपांडेंनी सूत्रसंचालन केले.
चाहत्यांशी संवाद साधताना सिद्धार्थ जाधव. सोबत रा.रं. बोराडे, रेखा शेळके.