औरंगाबाद- राज्यात गेल्या पंधरा वर्षांत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने राज्याचे वाटोळे केले. 75 टक्के मुस्लिम समाज आजही मागास असून 65 टक्के लोक झोपडपट्टीत राहतात. एका खोलीत पाच जण राहतात. मुस्लिम आणि दलितांना जाणूनबुजून गरीब ठेवण्यात आले आहे, असा आरोप एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केला.
एमआयएमच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी शनिवारी आमखास मैदानावर जाहीर सभा झाली. या वेळी ते बोलत होते. ओवेसी म्हणाले, एनडीएचे सरकार, यूपीएचे सरकार औरंगाबादला पासपोर्ट कार्यालय जाणूनबुजून देऊ शकले नाही. तीन आठवड्यांपूर्वीच मी पंतप्रधानांना एक पत्र पाठवले. आम्हाला जातीयवादी म्हटले जाते, आम्हाला कुणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही. आम्हाला हैदराबादचे पार्सल म्हटले जाते, परंतु मी भारताचा नागरिक आहे. शेवटच्या श्वासापर्यंत औरंगाबादेत येईल, असे ठणकावून सांगितले.
मालेगाव बॉम्बस्फोट कुणी केला जे निष्पाप मुस्लिम तरुण साडेपाच वर्षे तुरुंगात होते त्यांचे काय याचे उत्तर पृथ्वीराज चव्हाण, आर. आर. पाटील, शरद पवारांनी द्यावे. वक्फ बोर्डाच्या जमिनीतून फक्त 9 लाख 75 हजार रुपये मिळतात त्याचा हिशेब कोण देणार. नईम निष्पाप आहे तो कुठे आहे याचे उत्तर आम्हाला द्या. त्याचाही ख्वाजा युनूस सारखा मृतदेह मिळेल का. आमच्या मुलांना मारले जाते आणि आमच्या समाजाकडूनच मते मागितली जातात, असे ते महणाले. या वेळी मध्यचे उमेदवार इम्तियाज जलील, पूर्वचे डॉ. गप्फार कादरी, पश्चिमचे गंगाधर गाडे यांचेही या वेळी भाषण झाले.
या नगरसेवकांनी केला पक्षात प्रवेश
समाजवादी पक्षाचे नेते अय्युब जहागीरदार, समाजवादी नगरसेवक निसार अहेमद खान, काँग्रेसच्या माजी नगरसेविका अलका पाटील, नगरसेवक मुजीब आलम खान यांनी एमआयएममध्ये प्रवेश केला.