आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MP Chandrakant Kaire Comment On BJP Sena Alliance

युती केली नसती तर बरे झाले असते - खासदार खैरे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - गुलमंडी, बाळकृष्णनगर, विद्यानगर, पुंडलिकनगर सारख्या हक्काच्या वॉर्डांत, शिवाय इतर ठिकाणीही भाजपने बंडखोरांना रसद पुरवल्याने संतापलेल्या शिवसेनेने तोफ डागली आहे. भाजपने बंडखोरांना उघड उघड मदत करीत युतीचा धर्म पाळला नाही. युती केली नसती तर बरे झाले असते, असा थेट हल्ला शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी चढवला.
दुसरीकडे भाजपने आधी आपल्या बंडखोरांचे बघा, असे सांगत सणसणीत प्रत्युत्तर दिले आहे.
सायंकाळी साडेपाच वाजता मतदान संपल्यानंतर काही मिनिटांतच खासदार खैरे यांनी भाजपला निशाण्यावर घेतले. समर्थनगर वॉर्डात मुलगा ऋषिकेशसाठी मतदान केंद्राबाहेर ठाण मांडून बसलेल्या खैरेंनी मतदानाची वेळ संपताच पत्रकारांशी संवाद साधला. मतदानाबाबत समाधान व्यक्त करीत महापालिकेत शिवसेना-भाजप युतीच सत्तेवर येईल, असा दावा करीत आमच्या किमान ६० जागा येतील, असेही ते म्हणाले.
बंडखोरांचा धसका : यंदाच्या निवडणुकीत शिवसेना भाजप या दोन्ही मित्रपक्षांत बंडखोरीला उधाण आले होते. त्याचा फटका दोन्ही पक्षांना बसणार, असे चित्र आहे. विशेष म्हणजे शिवसेना भाजपने एकमेकांच्या वाॅर्डांतील आपल्या बंडखोरांना पद्धतशीरपणे पाठबळच दिले होते; पण शिवसेनेसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या आणि सेनेचा गड समजल्या जाणाऱ्या गुलमंडी, बाळकृष्णनगर, विद्यानगर, पुंडलिकनगर यांसह इतर वाॅर्डांत भाजपचे बंडखोर ताकदीने उतरल्याने शिवसेनेला चांगल्याच मिरच्या झोंबल्या होत्या. त्यात स्वत: खासदार खैरे यांनी प्रतिष्ठेच्या बनवलेल्या गुलमंडी (सचिन खैरे) बाळकृष्णनगर (महापौर कला ओझा) या दोन ठिकाणी सेनेच्या तोंडचे पाणी पळाल्याने खैरे भाजपवर चांगलेच तुटून पडले.
धर्म पाळला नाही : खैरे म्हणाले, या वेळी भाजपने युतीचा धर्म पाळला नाही. हे असेच करण्यासाठी युती केली होती का? युती झाली नसती तर बरे झाले असते. निदान स्वबळावर लढून चांगली कामगिरी झाली असती. बंडखोरांच्या बाबतीत भाजपचे वर्तन पाहून मला खूप दु:ख झाले आहे.

पदाधिकारी प्रचारात : ते म्हणाले की, भाजपचे पदाधिकारी उघडपणे बंडखोरांचा प्रचार करीत होते. नगरसेविका प्रीती तोतला उघडपणे राजू तनवाणी यांच्या बूथवर बसल्या होत्या. भाजपचे सहप्रमुख किशनचंद तनवाणी शिट्या वाजवत फिरत होते. त्यांच्या वाॅर्डांत आमचेही बंडखोर होते, आमच्यापैकी कोणीही त्यांचा प्रचार केला नाही; पण भाजपमध्ये उलट चित्र होते. विद्यानगरात मंगलमूर्ती शास्त्रींसोबत भाजपचे पदाधिकारी खुलेआम प्रचार करीत होते. मग युती केली कशासाठी?
फडणवीसांना पुरावे दाखवले
खैरे यांनी मयूरनगरातील भाजपचे बंडखोर संगीता ताठे यांच्या माहितीपत्रकावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सगळ्या भाजप नेत्यांचे फोटो छापले होते. माझ्याकडे अशा प्रकारची २० प्रचारपत्रके आहेत. मी ती मुख्यमंत्र्यांना दाखवली. तरीदेखील हा प्रकार सुरूच राहिला, याचे वाईट वाटते.

महापौरपद : युती धर्म पाळू
शिवसेनेच्या सर्वाधिक जागा येतील व महापौर निवडीच्या वेळी आम्ही युतीचा धर्म आधी पाळू. नंतर अपक्षांचा विचार करू; पण तशी गरज भासणार नाही, असे खैरे म्हणाले.

आधी तुमचे बघा : आमदार सावे

खैरे यांच्या आरोपांबाबत भाजपचे आमदार अतुल सावे म्हणाले की, आम्हाला बोलण्यापेक्षा शिवसेनेने आधी आपले किती बंडखोर होते हे बघावे. आमचे बंडखोर काही पदाधिकारी नव्हते; पण त्यांच्या तर बड्या पदाधिकाऱ्यांनी बंडखोरी केली, त्याचे काय? सुशील खेडकर, हिंमत पटेल, शिवा लुंगारे हे कोणाचे बंडखोर आहेत? अनिल जैस्वाल तर उघडपणे कुणाचा प्रचार करत होते हे तपासा. ह आपल्या बंडखोरांना ते आवरू शकले नाहीत म्हणून आमच्या नावाने खडे फोडले जात आहेत.